Monday, March 23, 2020

आवश्यक उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा




अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील
नागरिकांनीही दक्ष राहून प्रशासनाला सहकार्य करावे
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन
अमरावती, दि. 23 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी आवश्यक दक्षता घेऊया, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. जिल्ह्यातील संत्रा व दुग्ध उत्पादकांचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याबाबत आपणही शासनाकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांनी रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल नागरिकांचे, तसेच पोलीस, आरोग्य व इतर सर्व यंत्रणांचे अभिनंदन करत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, असाच संयम व धैर्य यापुढेही दाखवणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. स्वयंशिस्त घालून बाहेर पडणे टाळावे. आपली तसेच इतरांची दक्षता घ्यावी. वैद्यकीय सुविधा, दूध भाजीपाला, किराणा, इंधन अशा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. त्यात कुठेही अडचण येणार नाही, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात फॉगिंग व आवश्यक तिथे टँकरची तयारी ठेवावी.  ज्यांना होम क्वारंटाईन सांगितले आहे, ते काटेकोरपणे होते का त्याची खात्री करा. तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवा. वेळोवेळी सूचना प्रसारित करा. ग्रामीण भागात ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्याकडून दैनंदिन अहवाल घ्यावेत. आवश्यक तिथे नाकाबंदी व्हावी. पशुपालक शेतक-यांना आपल्या पशुधनासाठी पशुखाद्य मिळण्यात अडचणी येऊ नयेत. मात्र, दुकानांवर गर्दी होऊ नये,याची दक्षता घ्यावी.
                                      संत्रा उत्पादकांचा प्रश्न तत्काळ सोडवू

मध्यप्रदेश व इतर काही राज्यांत सीमा बंद करण्यात आल्याने संत्रा उत्पादकांना संत्रा नेण्यास अडथळे येत असल्याची तक्रार आहे. ही बाब तत्काळ शासनाच्या निदर्शनास आणली जाईल. जळगाव व नांदेड येथील संत्रा प्रक्रिया युनिटबाबत संत्रा उत्पादकांना येणा-या अडचणींबाबत जिल्हाधिका-यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करून तत्काळ प्रश्न सोडवावा, असे निर्देश त्यांनी दिले. मदर डेअरी दूध संकलन केंद्रांबाबत दुग्ध उत्पादकांच्या मागणीनुसार आवश्यक कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले.  
अमरावती कारागृहात मास्कनिर्मिती सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे, महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मितीचे काम तत्काळ सुरू करावे. आवश्यक आरोग्य सूचना वेळोवेळी प्रसारित करा. युज अँड थ्रो मास्कचा वापर एकवेळच करण्याबाबत सूचना प्रसारित व्हाव्यात. दुप्पटे, गमछे मास्क म्हणून वापरणे शक्य आहे. मात्र, ते वेळोवेळी धुण्याची काळजी घेतली पाहिजे. अशी दक्षतेसंबंधी आवश्यक माहिती नागरिकांमध्ये प्रसारित करावी. सर्व सफाई कर्मचा-याना मास्क पुरविण्यात आले किंवा कसे, याचा पडताळा घ्यावा. कंपन्यांना कामगार संख्या कमी ठेवण्यास व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही होते किंवा कसे, हे नियमित तपासावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

नागरिकांनी  रविवारी जनता संचारबंदी पाळून संयम व धैर्य दाखवले आहे. पोलीस, आरोग्य व इतर यंत्रणा चांगले काम करत आहेत. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे यापुढेही स्वयंशिस्त घालून गर्दी टाळावी. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून तपासणी करून घ्यावी. आपल्यासह इतरांनाही सुरक्षित करावे. सर्वांनी मिळून शिस्त, संयम व दक्षतेतून या संकटाचा यशस्वीपणे सामना करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.


00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...