Saturday, March 21, 2020

एमआयडीसी क्षेत्रात कामगारांची दक्षता घ्या


  कामगारांची संख्या कमी ठेवा
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या उद्योजकांनी शक्य असेल तेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवावी व कामगारांची वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. याबाबत उद्योगांची तपासणी करण्यासाठी चारजणांचे पथकही नियुक्त करण्यात आले आहे.

उद्योगांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत कामगार उपायुक्त अनिल कुटे यांना निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार उद्योगांकडून होणा-या कार्यवाहीची तपासणी करण्यासाठी चारजणांचे पथकही नियुक्त करण्यात आले आहे. फॅक्टरी निरीक्षक व्ही. जे. निकोडे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ व उद्योग विभागाच्या अधिका-यांचा या पथकात समावेश आहे.

औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी येणा-या कामगारांची संख्या कमी ठेवावी. त्यासाठी आवश्यक असल्यास शिफ्ट कराव्यात. कामगारांची येताना व जाताना तपासणी करून कोणालाही काही त्रास आहे का ते पहावे व कोणालाही काही त्रास असल्यास त्यांना कामाच्या ठिकाणी येऊ न देता त्यांना वैद्यकीय उपचार द्यावेत. जर कोणी अधिकारी किंवा उद्योगाशी संबंधित व्यक्ती परदेशवारी करून आली असेल व त्यांना काही लक्षणे असो किंवा नसो तरी त्यांची माहिती तात्काळ द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

एमआयडीसीमध्ये असणाऱ्या यंत्रणेची वारंवार स्वच्छता ठेवावी. विशेषत: ज्या ठिकाणी कामगारांचा स्पर्श होतो, त्याची वारंवार स्वच्छता करणे आवश्यक आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामगारांना वारंवार हात स्वच्छ धुण्याच्या व वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचा सूचना द्याव्यात. गर्दी टाळण्यासाठी मिटींग, ट्रेनिंग, सेमिनार, कॉन्फरन्स घेऊ नयेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजनांबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...