जीवनावश्यक वस्तू खरेदी- विक्रीच्या वेळेत ग्राहकांत अंतर राखण्याच्या सूचना,सोशल डिस्टन्स राखा, सुरक्षित राहा, दुस-यांनाही सुरक्षित ठेवा - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

       संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 अशी वेळ प्रशासनातर्फे निश्चित करून देण्यात आली आहे. या काळात नागरिकांची दुकानात गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सोशल डिस्टन्स राखून स्वत: सुरक्षित राहावे व इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या अनुषंगाने निश्चित करून देण्यात आलेल्या वेळेत ग्राहकांना सुरक्षितपणे खरेदी करता यावी, यासाठी दुकानांवर अंतर राखण्यासाठी मार्किंग असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मोकळी मैदाने या निश्चित कालावधीसाठी दुकानांसाठी उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. त्यानुसार महापालिका व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाही होत आहे.
         दुकानांवर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी विविध उपायांचा अवलंब व्हावा. ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या चुन्याने किंवा रंगाने मार्किंग करावी, यात किमान दोन ग्राहकांमध्ये 3 फुटाचे अंतर असावे, ग्राहकांना चिठ्ठी , टोकन द्यावे आणि त्यांना माल घेण्यासाठी वेळ द्यावी, शक्यतो व्हाटस ॲपद्वारे ऑर्डर घ्यावी व  ग्राहकांच्या वस्तू तयार करून ठेवाव्यात, शक्य तिथे होम डिलिव्हरीची व्यवस्था करावी, होम डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीस आय कार्ड द्यावे, दुकानदाराने त्यांच्या वाहनांना स्टिकर लावावे आणि त्याच्यासोबत किराणा, मेडिकल आदी अत्यावश्यक सामान असेल याची खात्री करावी, दुकानदार आणि त्यांचे मोबाईल नंबर यांची लिस्ट  व्हाट्सअप्प किंवा इतर माध्यमातून प्रसिद्ध करावी, मेडिकल दुकानात काम करणारे मजूर, मालक , माल उतरविण्यास  मदत करणारे हमाल, गाडी ड्रायव्हर यांना लगेच आय कार्ड द्यावे. या सूचनांचे पालन करून पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत*_.   त्याचप्रमाणे, आरोग्य केंद्रे, तपासणी कक्ष येथेही या सूचनेची अंमलबजावणी होत आहे.

              शहरात 16 मैदाने उपलब्ध

        संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीच्या मर्यादित वेळेत नागरिकांना धान्य, किराणा, फळे, भाजीपाला आदी वस्तू मिळाव्यात यासाठी महापालिकेने विक्रेत्यांना शहरातील 16 मैदाने उपलब्ध करून दिली आहेत.  
      या मैदानांवर विक्रेत्यांना सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत धान्य, किराणा, फळे, भाजीपाला वस्तू विक्रीसाठी ठेवता येतील. 100 मीटर परिसरात कमाल पाच अर्थात 20 मीटर परिसरात एक दुकान लावता येईल. मात्र, या काळानंतर विक्री साहित्य मैदानावर ठेवता येणार नाही, तसेच मैदानाच्या सफाईची जबाबदारी विक्रेत्यांची असेल.
        वलगाव रस्त्यावरील शासकीय उत्तर बुनियादी शाळेचे पूर्वेकडील मैदान, लालखडी (सुकळी) रस्त्याच्या दक्षिणेकडील व नरखेड रेल्वेलाईनच्या पूर्वेकडील आकोली वळण रस्त्याखालील जागा, राधानगर पाण्याच्या टाकीजवळील मैदान (मौजे शेगाव, सर्वे क्र. 14)मधील सार्वजनिक वापराची जागा, मौजे अकोली (सर्वे क्र. 25, फॉरेस्ट कॉलनी, अकोली रस्ता) महापालिकेची जागा, मौजे सातुर्णा येथील सर्वे क्र. 3 सार्वजनिक वापरासाठी आरक्षित मैदान, रुक्मिणीनगर, महापालिकेची शाळा क्र. 19 समोरील मैदान, जुनी वस्ती बडनेरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या पूर्वेकडील जुना बैल बाजार या नावाने ओळखले जाणारे मैदान, मुधोळकरपेठ येथील डॉ. पोटोडे यांच्या दवाखान्याजवळील मैदान, विद्यापीठ चौक- तपोवन रोडलगतचे मैदान (डेंटल कॉलेज रस्त्याच्या उत्तरेस व मार्डी रोडचे दक्षिणेस, एक्स्प्रेस हायवेच्या पूर्वेस), ग्रेटर कैलासनगर येथील मोकळा भूखंड (मौजे बेनोडा) सर्वे क्र. 11, छत्री तलावाच्या उत्तरेस मौजा जेवड सर्वे क्र. 15 (शासकीय जागा- चांदूर रेल्वे रोडच्या उत्तरेकडे व छत्री तलाव ते महादेव खोरीकडे जाणा-या रस्त्याच्या पूर्वेस), भटवाडी (अंबामंगलमच्या दक्षिण बाजूकडील मैदान, सातुर्णा सर्वे क्र. 18, मुरमुरे कारखान्यानजिक), त्याचप्रमाणे, चपराशीपुरा येथील विद्यमान शुक्रवारी बाजार, बडनेरा येथील सोमवार बाजार, शहरातील विद्यमान आठवडी बाजार व भाजीबाजार आदी ठिकाणी विहित वेळेत विहित अंतर राखून विक्री करता येईल.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती