Friday, March 20, 2020

जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता इतर दुकाने आजपासून बंद


अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला विक्री व औषधालये वगळता इतर दुकाने उद्या (दि. 21) सायंकाळी 6 वाजतापासून 25 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज निर्गमित केला आहे. 
कोरोना विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून संपर्कात येणा-या अन्य  व्यक्तीकडे होऊ नये यासाठी गर्दी टाळण्याची गरज आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व सोने-चांदीची दुकाने, कापड दुकाने, ऑटोमोबाईल दुकाने, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, टिंबर, प्लायवूड, आठवडी बाजार, मोबाईल विक्री व दुरूस्ती केंद्रे, सलून, ब्युटीपार्लर, गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, लॉज, धाबे, चहा व नाश्ता टपरी, पान टपरी व इतर सर्व दुकाने 21 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजतापासून 25 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील.  जीवनावश्यक वस्तू, औषधी दुकाने, किराणा दुकाने, फळ, भाजी विक्री दुकाने यांना यातून वगळण्यात आले आहे.
            या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती, संस्था, संघटना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असून, अशा व्यक्ती, संस्था, संघटनांविरुद्ध पोलीसांनी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
        प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...