Friday, March 20, 2020

प्रतिबंधात्मक उपायांसाठी नागरिकांचा स्वत:हून पुढाकार




            विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा सावंगा विठोबा येथे भेट
अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील यात्रा महोत्सव समारंभ रद्द करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्यानिमित्त नियोजित यात्रा महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त पियुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सावंगा विठोबा येथे भेट देऊन तेथील विश्वस्तांशी चर्चा केली.

            सावंगा विठोबा येथील वामनराव रामटेके, विनायकदादा पाटील, गोविंदराव राठोड, गटविकास अधिकारी अलमास मुनीर सय्यद, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधाकर उमक यांच्यासह विश्वस्त मंडळी उपस्थित होते. चारशे वर्षात प्रथमत:च यात्रा महोत्सव स्थगित करण्याची वेळ आली आहे. तथापि, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गावकरी व विश्वस्त मंडळी यांनी पुढाकार घेत प्रशासनाला सहकार्य करत यात्रा महोत्सव स्थगित केला. संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            सावंगा विठोबा येथे यात्रेनिमित्त दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नागरिकांनाही विश्वस्त मंडळींकडून आवाहन करण्यात येत आहे. विश्वस्त मंडळी व गावक-यांकडून प्रशासनाला चांगले सहकार्य मिळत आहे. या अनुषंगाने परिसरातील सर्व गावांमध्ये वेळोवेळी जनजागृती करावी, असे निर्देश श्री. सिंह यांनी यावेळी दिले.
                                                गावागावांतून मिळतेय सहकार्य
        प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला गावागावांतून मोठे सहकार्य मिळत आहे. ठिकठिकाणी ग्रामपंचायतींकडून संदेशफलक व विविध माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार स्थगित करण्यात आले आहेत. नागरिक स्वत:हून प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्यावर भर देत आहेत. विवाह समारंभही कौटुंबिक स्तरावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास नागरिकांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे गट विकास अधिकारी श्रीमती सय्यद यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...