जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा नियमित राहील



आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित ठेवा

  गर्दी टाळा, प्रशासनाला सहकार्य करा
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे कळकळीचे आवाहन

       कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी दक्षतेबाबत सूचना जारी होत आहेत. त्यामुळे या सूचनांचे पालन करून नागरिकांनी घरीच थांबावे. या काळात दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तथापि, _परिस्थितीचे गांभीर्य ओळखा.  कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी  सर्वांनी दक्षता पाळा. इतरांनाही सुरक्षित ठेवा_, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

            _गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यातील समस्त नागरिकांना शुभेच्छा देत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, निरामय आरोग्यासाठी दक्षतेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे_. आपण सर्वांनी मिळून आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे पालन करूया व कोरोना विषाणू संसर्गाचा यशस्वीपणे प्रतिबंध करूया. प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे, दक्षता घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.     

            जिल्ह्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु ठेवण्यात आला आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य नागरिकांना मिळण्यासाठी व सुरक्षितता राखली जावी यासाठी विक्री केंद्रांना मोकळी मैदाने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय अमलात आणला आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये,  नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

            अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावे. _जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल_, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

     

000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती