Tuesday, March 31, 2020

कोविड-१९ च्या संशयित रुग्णांबाबत खाजगी रुग्णालयांनी घ्यावयाची दक्षता




          मुंबई, दि. ३१ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालये, सुश्रुषा केंद्रांनी कशा प्रकारे कार्यरत रहावे याबाबत राज्य शासनाने एक नियमावली तयार केली आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे.
१.     अशा खाजगी रुग्णालयांमध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण आल्यास त्यांनी, इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च या संस्थेने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोविड-१९ च्या उपचार करणाऱ्या शासकीय वा इतर रुग्णालयांमध्ये संबंधित संशयित रुग्णास तत्काळ दाखल करावे.
२.    खाजगी रुग्णालये नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाशी संपर्क साधून संबंधित संशयित रुग्णासाठी बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध आहेत का, याची खात्री करुन घेतील. सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत पुरविण्यात आलेल्या, १०८-रुग्णवाहिकेमधून किंवा कोविड-१९ रुग्णवाहिकेमधूनच संबंधित रुग्णाला पाठविण्यात यावे. दोन्ही संचालनालयामार्फत प्रत्येक कोविड-१९ रुग्णालयात, १०८-रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. भारत सरकारने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार संशयित रुग्णाला पाठविण्यात यावे. नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयात बेड आणि रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास त्यानंतरच्या नजिकच्या कोविड-१९ रुग्णालयाकडे या रुग्णाला पाठविण्या संदर्भात विचारणा करण्यात यावी.
३.    ज्या खाजगी रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार होत नाहीत, त्यांनी त्यांच्या परिसरातील कोविड-१९ च्या रुग्णांचा उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती करुन घेतल्याची खात्री सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी करुन घ्यावी.
४.   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्यात येणाऱ्या सर्व अशासकीय रुग्णालये / केंद्रांची यादी तयार करावी.
५.   संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांची यादी तयार करावी.
६.    ही यादी सर्व रुग्णालयांकडे पाठविण्यात यावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर लावण्यात यावी.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...