विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथोत्सव मोलाचा - वसंत आबाजी डहाके






अमरावती, दि. 7 : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन त्यांच्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथोत्सव हा मोलाची भूमिका निभावतो. व्यक्तीचे मन विकसित करण्यासोबतच प्रगल्भ विचारांची जडणघडण ग्रंथ वाचनातून होत असते, त्यामुळे तरुण वाचकांनी ग्रंथोत्सवातून प्रेरणा घेऊन वाचन संस्कृती चळवळीप्रमाणे वाढविली पाहिजे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी आज येथे सांगितले.
येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. आमदार प्रताप अडसळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रपाठक प्रा. डॉ. हेमंत खडके, सहायक ग्रंथपाल संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील, प्रकाशक नंदकिशोर बजाज आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            श्री. डहाके म्हणाले की, ग्रामीण भागात भरपूर वाचकवर्ग आहे, परंतू त्यांच्यापर्यंत वाचण्यासाठी साहित्य, ग्रंथ संपदा पोहोचत नाही, ही खंत आहे. गावातच कथा, कादबंरी, ललीत, स्पर्धा परीक्षांची पुस्तके अशी अनेक चांगली ग्रंथ, पुस्तके वाचनालयात उपलब्ध करुन दिल्यास ग्रामीण भागातील वाचकवर्ग सुध्दा सुखी होऊ शकेल. ग्रंथ हे आजही मनुष्याच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावित आहे. पुस्तकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कुठल्याही विषयासंबंधी लवकर जनजागृती होऊ शकते. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, या हेतूने त्यांच्या पत्नी डॉ. प्रभा गणोरकर यांनी शिरजगाव बंड येथे वाचनालय सुरु केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
            तंत्रज्ञानाच्या मदतीने जग पुढे जात आहे. वाचनाच्या क्षेत्रात सुध्दा ई-बुक्स ही संकल्पना रुढ झाली आहे. आजकालची तरुण पिढी ही वॉट्सॲप आणि फेसबुक मध्येच रममान झाली आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी झाला पाहिजे. तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे परंतू, पुस्तकातील मुद्रीत मजकूर वाचून जे समाधान मिळते ते त्यात मिळत नाही. स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अनेक विद्वानांनी, साहित्यकांनी समाजाला जागृत करण्याचे काम ग्रंथ निर्मितीतून केले आहे. लेखक आणि वाचकांनी अनेक धोके पत्करुन ग्रंथ संस्कृती, वाचन संस्कृती टिकवून ठेवली आहे. मानसाचे संपूर्ण आयुष्य बदलून देण्याची मनोविज्ञानिक ताकद ग्रंथात आहे. संतांनी लिहीलेले साहित्य हे मनुष्य जीवांवर औषधांसारखे काम करतात. जे. कुलकर्णी यांच्या कादंबरी, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे यांची पुस्तके, साने गुरुजी यांनी लिहीलेले सोन्या मारुती आदी लेखकांचे दाखले देऊन त्यांनी वाचनांचे महत्व समजावून सांगितले. गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना गावागावात निर्माण झाली पाहिजे. या माध्यमातून केरळ राज्याप्रमाणेच सकल महाराष्ट्र सुध्दा शंभर टक्के साक्षर होऊन नावलौकीकास आला पाहिजे, असे मनोदयही श्री. डहाके यांनी यावेळी व्यक्त केले.
           
            आमदार प्रताप अडसळ म्हणाले, वाचन संस्कृती ही पूर्वापार पासून चालत आली आहे. वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम होणे आवश्यक आहे. प्रत्येक गावांत वाचनालय निर्माण करुन त्यात चांगली ग्रंथसंपदा आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची विविध पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सांस्कृतिक व नैतिक अधनपतन रोखण्यासाठी वाचन संस्कृतीचे वाढ होणे आवश्यक आहे. लहान मुलांमध्येही वाचनाची बालपणापासून गोडी निर्माण करण्यासाठी घराघरात वाचनीय बाल साहित्यांसह इतर ग्रंथ, पुस्तके त्यांना उपलब्ध करुन द्यावीत. आताच्या महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटना पाहता, लहानपणीच जर वाचनाचे चांगले संस्कार झालीत, तर अशी विकृती समाजात निर्माणच होणार नाही. पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हाती मोबाईल न देता पुस्तक द्यावे. गाव तिथे वाचनालय ही संकल्पना प्रभावीपणे राबवून गावांत वाचनालयाची निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            परीक्षांच्या तयारीसाठी वाचन जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच चरितार्थ मिळविण्यासाठी सुध्दा वाचन आवश्यक आहे. चरितार्थचे साधन सुध्दा वाचनातूनच मिळते, त्यासाठी विद्यार्थ्यांनी जीवन जगण्यासाठी तसेच जीवनाचे सार समजून घेण्यासाठी वाचन करावे. चांगली पुस्तके, ग्रंथ, कथा- कादंबरी यांच्या वाचनातून सद्सद् विवेकी मनुष्य घडत असतो. युनेस्कोच्या घटनेमध्ये सुध्दा पुस्तकाचे वाचन ही सनद ठेवण्यात आली आहे. युध्द भूमिवरील युध्द थांबविण्यासाठी शांततेची फळी निर्माण करण्याची ताकद वाचनात म्हणजेच साहित्यात दडलेली आहे. विवेकवादी समाज निर्मितीमध्ये वाचनाचे महत्वपूर्ण स्थान आहे, असे प्रा. हेमंत खडके यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल अधिकारी सुरज मडावी यांनी केले तर विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील यांनी आभार मानले. जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी-कर्मचारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथोत्सवाचे आयोजन केलेल्या विभागीय ग्रंथालयाच्या आवारात नागपूर शासकीय मुद्रणालय यांच्यासह इतर प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी दालने उभारण्यात आली असून उद्याला सुध्दा (दि. 8 मार्च पर्यंत) ग्रंथोत्सव सर्वांसाठी खुले राहील.
000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती