एसटी, रेल्वे व खासगी बस प्रवाश्यांची तपासणी सुरू













                                                 
            विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांकडून पाहणी

अमरावती, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी बाहेरून येणा-या प्रत्येक प्रवाशाची तपासणी दक्षतापूर्वक करावी. कुणातही लक्षणे आढळल्यास तत्काळ सुस्पष्ट नोंद व माहिती घेऊन जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात यावे. ही कार्यवाही काटेकोरपणे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वे, एस टी, तसेच खासगी बसमधील प्रवाशांची तपासणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. नागपूर, पुणे, मुंबई, यवतमाळ येथून येणाऱ्या एसटी बसेस तसेच रेल्वे प्रवासी यांची तपासणी मोझरी व बडनेरा बस स्थानक तसेच चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व बडनेरा रेल्वे स्थानक येथे करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज बडनेरा बसस्थानकावर भेट देऊन तपासणी कक्षाची पाहणी केली. प्रत्येक प्रवाशाची काटेकोर तपासणी करा. प्रत्येक नोंद काळजीपूर्वक घ्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या, तसेच खासगी बसेस यातील प्रवाशांची व रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.   एसटी  महामंडळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले पथके त्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. 

           मुंबई, पुणे, यवतमाळ येथून बसेसची तपासणी बडनेरा बस स्थानकावर, तर रेल्वे प्रवाशांची तपासणी बडनेरा रेल्वे स्थानकावर केली जात आहे.बडने-याबरोबरच चांदुर रेल्वे स्थानक आणि धामणगाव रेल्वे स्थानकावर हे तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली असून संबंधित रेल्वे स्थानकांच्या स्टेशन मास्टर यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनीही प्रवाश्यांशी संवाद साधून विचारपूस केली. प्रतिबंधात्मक उपायांबाबत माहितीही यावेळी प्रवाश्यांना देण्यात आली. पथकांनी काटेकोरपणे तपासणी करावी. हलगर्जी होता कामा नये, असे निर्देश यावेळी देण्यात आले. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज वलगाव येथे आयसोलेशन क्षेत्रासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचीही पाहणी केली.    

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती