‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार’
उपक्रम जिल्ह्यात राबविणार- जिल्हाधिकारी
7 सप्टेंबर पर्यत शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती दि.31 (जिमाका): शेतकरी उत्पादित माल थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 7 सप्टेंबर पर्यत कृषि व पणन मंडळ कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, कृषि व पणन मंडळाचे व्यवस्थापक दिनेश डागा, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी पतंगे, जिल्हा कृषि समृद्धी प्रकल्प व्यवस्थापक, कृषि पणन तज्ञ बाजार समितीचे सचिव, आत्मा कार्यालय प्रकल्प संचालक व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले कि, राज्य शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनिमय) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा केल्या आता शेतकरी ताज्या भाज्या व फळे थेट ग्राहकांना विक्री करु शकतील. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री केल्यास नाशवंत मालाचा दर्जा टिकुन राहतो व मुल्य साखळीतील मध्यस्थांची संख्या कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त होईल. ग्राहकांना किफायतशीर दरात फळे व भाजीपाला उपलब्ध होऊ शकेल. शासनाच्या दि.12 व 24 ऑगस्टच्या आदेशामध्ये याबाबतची विस्तृत माहिती नमुद करण्यात आली आहे.
संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजारया उपक्रमांतर्गत महानगर पालिका, नगर परिषद तसेच शासकीय जागेवर केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी नगरपालिका क्षेत्रात एक तसेच महानगर पालिका क्षेत्रात किमान 3 ते 4 मैदान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मैदानावर दर शनिवारी तथा रविवारी बाजार थाटुन ताज्या भाज्या, फळे थेट विक्रीसाठी ठेवता येणार आहे. प्रत्येक बाजारावर देखरेखीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाद्वारे एका आयोजकाची नेमणुक करण्यात येणार आहे. हे आयोजक नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था किंवा ग्राहक सरकारी संस्था किंवा सहकारी संस्था (खरेदी विक्री संघ) हे असतील. याशिवाय नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाने 7 सप्टेंबर पूर्वी संबंधित क्षेत्रांमध्ये बाजारासाठी जागा निश्चिती करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
या उपक्रमाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था सदस्यांनी व्यवस्थापक, कृषि व पणन मंडळ, जुना कॉटन मार्केट, अमरावती यांच्याशी दि.7 सप्टेंबर पर्यत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 9850423244 वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

वाघ/कोल्हे/दि.31-08-2016/18.15 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती