धामणगांव रेल्वे येथे दि.14 ते 29 सप्टेंबर पर्यत
सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनास प्रवेश बंदी
          अमरावती, दि.16 (जिमाका): धामणगाव रेल्वे शहरात जड वाहतुकीची रहदारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ही समस्या पाहता जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशान्वये दि. 14 ते 29 सप्टेंबर पर्यत धामणगांव रेल्वे शहरात सकाळी 7 वा. ते रात्री 8 वाजेपर्यत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
धामणगाव रेल्वे येथील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच गावातील लोक वाहनांचा वापर करतात. याशिवाय रेल्वे यार्ड मधुन दिवसभर 70 ते 80 ट्रक विविध मार्गाने शहराबाहेर पडतात. अशा वेळेस जड वाहतुकीने किंवा इतर वाहतुकीने किरकोळ /गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच नगर परिषद, धामणगांव रेल्वे यांनी 4 ऑगस्ट 2015 रोजी विशेष ठराव क्र. 4 नुसार जड वाहनास प्रवेश बंदी असावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33(1) (ब) तसेच मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये जड वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा दंडाधिकारी किरण गित्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.   
00000
वृत्त क्र.952                                                                            दिनांक 16-09-2016
केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत
ठिबक/तुषार संच बसविण्यासाठी दि.6 ऑक्टोंबर पर्यत
ऑनलाईन अर्ज आमंत्रित
          अमरावती, दि.16 (जिमाका): प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनातंर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2016-17 या वर्षामध्ये ठिबक/तुषार संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी दि. 6 ऑक्टोंबर 2016 पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले आहे.
            केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2016-17 या वर्षामध्ये विदर्भात राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील सन 2016-17 चा एकुण रु. 1275.17 लाख रक्कमेचा वार्षिक कृति आराखडा शासनाकडुन प्राप्त झालेला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेतंर्गत ठिबक/तुषार संच बसविण्यासाठी ई-ठिबक आज्ञावलीवर दि.6 ऑक्टोंबर पर्यत दिलेल्या मुदतीत संपुर्ण माहिती असलेला ऑन लाईन अर्ज सादर करावयाचा आहे. त्याकरीता शासनाकडुन अशा प्रकारची लिंक mahsethibak.gov.in यावर उपलब्ध करुन दिलेली आहे. मुदतीनंतर अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

वृत्त क्र.953                                                                            दिनांक 16-09-2016
आरे दुधाबाबत सुचना
            अमरावती, दि.16 (जिमाका) : 17 सप्टेंबर पासुन शहरात वितरित होणाऱ्या आरे ब्रान्ड अंतर्गत पिशवी बंद दुधाच्या पाकीटवर पाश्चराईज होमोजिनाईज टोन्ड मिल्क किंमत 16 रुपये असे छापले असले तरी त्या ऐवजी ग्राहकांनी तो होमोजिनाईज प्रकिया गाय दुध किंमत रु. 17 समजण्यात येऊन पिशवी बंद पाकिट खरीदी करण्यात यावे. तसेच वितरण वाढीचे दृष्टिकोणातुन शहरात ज्या ठिकाणी शासनाचे अधिकृत विक्रेते उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी अधिकृत दूध विक्रेत्यांची नेमणुक करण्यात येत असल्यामुळे ईच्छुकांनी वितरण अधिकारी दुध योजना येथे संपर्क करण्याचे आवाहन दुग्ध शाळा व्यवस्थापक, शासकीय दुध योजना अमरावती यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र.954                                                                           दिनांक 16-09-2016
सहकार पुरस्कारासाठी संस्थांकडुन 17 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव आमंत्रित
          अमरावती, दि.16 (जिमाका): सन 2015-16 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव करण्यासाठी शासनाने गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ‘सहकार पुरस्कार’ देण्याचे ठरविलेले आहे. तरी इच्छुक सहकारी संस्थांनी त्यानुसार सविस्तर प्रस्ताव तयार करुन ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे. त्या तालुक्याचे संबंधीत सहाय्यक निबंधक/उपनिबंधक यांच्या कार्यालयात दि. 15 सप्टेंबर 16 ते 7 ऑक्टोंबर 16 पर्यत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.
            या संदर्भातील अधिक माहितीसाठी संस्थांन उप/ सहाय्यक निबंधक/ जिल्हा उपनिबंधक/ विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र.955                                                                            दिनांक 16-09-2016
ग्राम नांदुरा येथील पेढी नदी भागात
कलम 144 फौ.प्र.स. लागु
          अमरावती, दि.16 (जिमाका): अमरावती पोलीस आयुक्तालयात दि.15 सप्टेंबर 16 ते 19 सप्टेंबर 16 पर्यत गणेशोत्सव विसर्जन मोठ्या प्रमाणात होत आहे. आयुक्तालय हद्दीतील ग्राम नांदुरा येथील पेढी नदी पो. स्टे. वलगांव येथे जलसंवर्धनाचे काम केले असुन पेढी नदीतील मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे-झुपे काढण्यात आल्याने नदीचा भाग खोल करण्यात आला आहे. त्यामुळे पुलाचे ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाली आहे. सदर ठिकाणी मुर्ती विसर्जन केल्याने मूर्तीची विटंबना होवू शकते व पाण्याचे प्रदुषण होवून नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. मुर्ती विसर्जनास मनाई केल्यामुळे लोकांमध्ये व गावकऱ्यांमध्ये वादा-वादी होवून कायदा व सुव्यव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही स्थिती पाहता विशेष कार्यकारी दंडाधिकारी सहा. पोलीस आयुक्त, गाडगे नगर अमरावतीच्या चेतना तिडके यांनी ग्राम नांदुरा पेढी नदी मध्ये गणपती विसर्जन करण्यास कलम 144 फौ.प्र.स. अनुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे. सदर आदेश दि.14 सप्टेंबर 16 च्या मध्यरात्रीपासुन ते दि.19 सप्टेंबर 16 च्या मध्यरात्री पर्यत विसर्जन परिसरात लागु राहील. 
            या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे विशेष कार्यकारी दंडाधिकारी सहा. पोलीस आयुक्त, गाडगे नगर अमरावतीच्या चेतना तिडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्र.956                                                                            दिनांक 16-09-2016
परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाने दिला सामाजिक संदेश
न्यु आज्ञाद गणेशोत्सव मंडळ प्रांगणात प्रदर्शनीचे आयोजन
          अमरावती, दि.16 (जिमाका): उत्सवाच्या माध्यमातुन जनमाणसात सामाजिक जाणीव निर्माण करीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक संदेश देणाऱ्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. खापर्डे बगीचा परिसरातील न्यु आझाद गणेशोत्सव मंडळ येथे आयोजित प्रदर्शनी मध्ये ‘मृत्युनंतर जीवन जगा, अवयव दान श्रेष्ठ दान, स्तनपान अमृतपान’ अशा विविध विषयावर आधारित पोस्टर्स, रांगोळी व मॉडेल ठेवण्यात आले होते.
          महाराष्ट्रात दर हजारी पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाण कमी होत आहे. त्याचे गंभीर परिणाम रोखण्यासाठी तसेच स्तनपानाद्वारे सुदृढ भारत निर्मिती म्हणुन समाजात जनजागृती घडावी या उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावतीचे डॉ. आसोले, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या प्राचार्य तारा शर्मा यांनी दि. 13 व 14 सप्टेंबर 16 रोजी न्यु आझाद गणेशोत्सव मंडळ येथे प्रदर्शनी लावली.
          प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थीनीं मोलाचे योगदान दिले. याशिवाय गणेश मंडळाचे संस्थापक दिनेश बुब यांचेही सहकार्य लाभले. या प्रदर्शनी द्वारे ‘बेटी बचाओ, अवयव दानाचे महत्व, स्तनपानास प्रेरणा’ इत्यादी विषयांची माहिती देखील स्थानीय भक्तांनी घेतली.
00000
काचावार/कोल्हे/दि.16-09-2016/11-26 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती