शिधावस्तू व केरोसीनचे निर्धारित वाटप जाहीर
अमरावती दि.1 (जिमाका): जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे सर्व पात्र कौटुंबिक शिधापत्रिकाधारकांचे माहे सप्टेंबर, 2016 च्या वितरणाकरिता रास्तभाव दुकानदारांना दि.21 ऑगस्ट, 2016 पासून धान्याचा पुरवठा सुरु झाला असून रास्तभाव दुकानदारांनी जिल्ह्यातील कार्यरत शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
            अंत्योदय कार्ड संख्येनुसार धारकांसाठी  प्रति शिधापत्रिका 20 किलो गहू, 15 किलो तांदूळ वितरित करण्यात येतील. गव्हाचा प्रतिकिलो दर 2 रुपये असून तांदूळ प्रतिकिलो 3 रु. या दराने वितरित करण्यात येईल. तुरडाळ 1 किलो 103 रुपये या दराने वितरित करण्यात येईल. प्राधान्य गटातील लाभार्थी संख्येनुसार धारकांसाठी 2 रु. प्रति किलो या दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू वितरित करण्यात येणार असुन 3 रु. प्रति किलो तांदुळ या दराने प्रति व्यक्ती 2 किलो तांदुळ वितरित करण्यात  करण्यात येणार आहे तर साखरेचा दर प्रति किलो 13.50 रु. आहे. एपीएल शेतकरी लाभार्थी संख्येनुसार 3 किलो गहु 2 रु.प्रति किलो दराने तर 2 किलो तांदुळ 3 रु.प्रति दराने वितरीत करण्यात येणार आहे.
माहे सप्टेंबर, 2016 करीता अंत्योदय लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 20 किलो गहू व प्रतिकार्ड 15 किलो तांदूळ तसेच प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो मंजूर केलेला आहे. माहे सप्टेंबर, 2016 करीता पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना प्रति माणसी 500 ग्रॅम व सणासुदीची प्रती माणसी 150 ग्रॅम असे एकूण 650 ग्रॅम साखरेचे वाटप देण्यात येईल.
शासन निर्णय दि.20 ऑगस्ट, 2015 पासुन शहरी व ग्रामीण भागातील बिगर गॅस शिधापत्रिकासाठी प्रती महा 1 व्यक्तीसाठी 2 लिटर, 2 व्यक्तीसाठी 3 लिटर व 3 व्यक्ती किंवा त्याहुन अधिक व्यक्तीसाठी 4 लिटर केरोसिन उपलब्धतेनुसार देण्यात येईल. 1 गॅस तसेच 2 गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकास वार्षिक 12 गॅस सिलेंडर सवलतीच्या दराने अनुज्ञेय असल्यामुळे त्यांना केरोसीन देण्यात येणार नाही असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र.912                                                                       दिनांक 1-09-2016
केबल जोडण्या विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण सोडत 3 सप्टेंबर रोजी
 केबल ऑपरेटर यांनी उपस्थित रहावे

        अमरावती, दि. 1 (जिमाका) : महसूल व वनविभाग यांचा दि.26 मार्च 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रत्येक जिल्हयात केबल जोडण्यांचे संदर्भात विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण करण्याकरीता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढुन प्रत्येक जिल्ह्यातून तीन केबल ऑपरेटर व एक बहूविध यंत्रणा परिचालक (MSO) यांची केबल जोडण्यांचे सर्वेक्षणाकरीता निवड करावयाची आहे. याकरीता सोडत क्र.16 दि.3 सप्टेंबर, 16 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे दुपारी 12-30 वाजता सभागृह क्र.1 मध्ये काढण्यात येईल. या सोडतीकरीता अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर व बहुविध यंत्रणा परीचालक (MSO) यांनी हजर राहावे.
00000


वृत्त क्र.913                                                                       दिनांक 1-09-2016
पोळा, गणेश चतुर्थी व अनंत चतुदर्शी रोजी
मद्यविक्री बंद
          अमरावती दि.1 (जिमाका): जिल्ह्यात पोळा सण दि.1 सप्टेंबर, 16 रोजी, गणेश स्थापना दि.5 सप्टेंबर, 16 रोजी तसेच दि.15 सप्टेंबर ते दि.20 सप्टेंबर, 16 या कालावधीत विर्सजन करण्यात येणार आहे. वरील दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती जिल्ह्यामधील सर्व एफएल-2, एफएल-3 (परमिट रुम), एफएल/विआर-2 व सीएल-3 अनुज्ञप्त्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 42 (1) अन्वये मद्य विक्री बंद ठेवण्यात याव्यात.
          अनंत चतुदर्शी दि.15 सप्टेंबर, 16 सोडुन इतर दिवशी सार्वजनिक मिरवणूक असल्यास महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक मिरवणूक मार्गात येणाऱ्या सर्व पोलिस स्टेशन क्षेत्रात, हद्दीत सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या विसर्जन मिरवणुक असतील त्या त्या गावात सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत त्या गावांच्या हद्दीतील (ग्रा.प.) सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या म्हणजेच एफएल-2, एफएल-3 (परमिट रुम), एफएल/विआर-2 व सीएल-3 बंद ठेवण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशान्वये कळविले आहे. 
00000

वाघ/गावंडे/दि.1-9-2016/11-51 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती