अवयव दान सप्ताहाच्या निमित्ताने लेख
जगात सत्पात्री दानाच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. विद्यादान, कन्यादान, नेत्रदान या अशा काही दानाच्या संकल्पना मात्र अवयव दानाविषयी अद्यापही आपल्या देशात फारशी जाणीव जागृती नाही. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान राज्यात महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्याबाबत माहिती देणारा हा लेख.
अवयव दान श्रेष्ठ दान
अवयवदान म्हणजे काय?
            जिवंतपणी अथवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन ज्याद्वारे आपण मृत्युनंतर आपले अवयव दान करुन अंतिम स्वरुपी ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत. अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णाचे अवयव कायम स्वरुपी निकामी झाले आहेत अशा अनेक रुग्णांसाठी हाच एक आशेचा किरण आहे.
अवयव प्रत्यारोपण/प्रतिरोपण म्हणजे काय?
            मानवी अवयव प्रत्यारोपण म्हणजे आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक मोठी उपलब्धीच आहे. या उपचारामध्ये एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करुन तो एखाद्या गरजवंत रुग्णामध्ये प्रत्यारोपित करतात ज्यांचा एखादा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित व उपलब्ध अशी उपचार पद्धती आहे.
आपण कोणत्या अवयवांचे दान करु शकतो?
अ)मेंदु स्तंभ मृत्यू (Brain Death) : मृत व्यक्ती जिची ह्दयक्रिया चालु आहे पण जिचा मस्तिष्क्‍ स्तंभ मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मुत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, स्वादुपिंड, ह्दय, आतडी, डोळे, त्वचा ह्दयाची झडप आणि कानांचे ड्रम यांचे देखील दान करु शकते.
ब)सामान्य मृत्यू (Normal Death): मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया बंद पडली आहे अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयावांचे दान करु शकतो.
क)जिवंत व्यक्ती (Live Donor) : जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाइकांसाठीचा अवयवदान करु शकते. रुग्ण दात्याच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहिण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. या व्यतिरिक्त कोणालाही रुग्णांसाठी अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवाणगी घ्यावी लागते. शासन रुग्ण व दाता यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण नसुन फक्त प्रेम व स्नेह या नात्यानेच अवयवदान होत आहे याची खात्री झाल्यावरच अवयवदानास परवाणगी देते. जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित अवयवांचेच म्हणजे मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतो.
मस्तिष्क स्तंभ मृत्यु म्हणजे काय?
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते. चेतना व श्वासोच्छवास या दोन्हींचे केंद्र आपल्या मेंदुतील मस्तिष्क स्तंभ या भागात असते. अपघातात डोक्याला मार लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदुच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तिष्क स्तंभास कायमस्वरुपी इजा झाल्यास त्या व्यक्तिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू होवू शकतो.
            एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने ह्दय कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवले असेल तसेच काही ठराविक व प्रमाणित चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तिष्क स्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे ह्दय जास्तीत जास्त 16 ते 72 तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होवू शकते. यासाठी या रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांची संमती असणे आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने प्रतिरोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाल्यासच होवू शकते.
मस्तिष्क स्तंभ मृत्यूचे निदान कसे होते?
            सरकारने मान्यता दिलेले 4 डाक्टर्स एकत्रितपणे मस्तिष्क स्तंभ मृत्यूच्या चाचण्या करुन एखाद्या रुग्णास ब्रेन डेड अथवा मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करतात. या 4 डाक्टरांचा अवयव प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नसतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू फक्त अवयव प्रतिरोपणासाठी आणि निवड अवयव काढण्यासाठी सरकारी मान्यता असलेल्या रुग्णालयांमध्येच घोषित करता येतो. मस्तिष्क स्तंभ मृत्यूला आपल्या देशातच नाही तर जगात मान्यता आहे व मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मस्तिष्क स्तंभ मृत्यूचा दाखला देण्याता येतो.
मस्तिष्क स्तंभ मृत अथवा ब्रेन डेड व्यक्ती जगण्याची काही शक्यता असते का?
            नाही. एखाद्या व्यक्तिस मस्तिष्क स्तंभ मृत्यू अथवा ब्रेन डेड घोषित केले असेल तर ती व्यक्ती जगण्याची शक्यता अजिबातच नसते व ती व्यक्ती मृत असते. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती व कोमातील रुग्ण यामध्ये फरक आहे. कोमातील रुग्ण मृत नसतात व ते परत जगण्याची शक्यता असते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत घोषित करणे म्हणजे इच्छामरण असे बिलकुल नाही. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्ती ही मृत असतो.
अवयवदान  करायचे असल्यास मृत्यू हा रुग्णालयात येणे गरजेचे आहे का?
            हो. मस्तिष्क स्तंभ मृत्यू हा प्रतिरोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातच घोषित करता येत असल्याने अशा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातच मृत्यू झाल्यास अवयवांचे दान होवू शकते. परंतू डोळे व त्वचा यांचे दान मृत्यूनंतर सहा तासापर्यंत घरी मृत्यू झाला तरी होवू शकते.
कोणत्याही धर्माचा माणूस कोणासाठीही अवयवदान करु शकतो
मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयव दान कायदेशीर आहे का?
            हो.भारतामध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार मस्तिष्क स्तंभ मृत्यू व अवयवदान या दोन्हींना मान्यता दिली आहे. या कायद्याची खालील विशेष उद्दिष्टे आहेत. मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे जेणेकरुन मृत्यूनंतर अवयवदान होवू शकेल. रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे, साठवणे व प्रतिरोपण करणे यावर नियंत्रण ठेवणे. मानवी अवयवांच्या व्यापारावर प्रतिबंध घालणे. कायद्याने अवयव विकणे, विकत घेणे व त्यासाठी जाहिरात करणे किंवा अवयव मिळवूण देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्थी करणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
अवयव दानानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीचे शरीर त्याच्या नातेवाईकांना परत दिले जाते का?
            हो. मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीचे अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपूर्वक त्याच्या नातेवाईकांना अंतिमविधीसाठी परत दिले जाते. अवयवदान व देहदान या दोन्हींमध्ये फरक आहे. देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकिय प्रशिक्षणासाठी वैद्यकिय महाविद्यालयामध्ये ठेवून घेतले जाते. अवयवदानामधील सदर अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जातात व शरीर नातेवाईकांना परत केले जाते.
दान केलेल्या अवयवांचे वितरण कसे होते? ते फक्त श्रीमंत व्यक्तींनाच दिले जातात का?
            नाही. गरजु रुग्णांचे वय, रक्त गट, त्यांच्या आजाराची तीव्रता, ते किती दिवस अवयवांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांची वैद्यकिय गरज या सर्वांसाठी प्रत्येक रुग्णास काही गुण दिले जातात. या सर्व गरजु रुग्णांची एक सामायिक यादी केली जाते व सर्वाधिक गरजु रुग्णास अवयव दिला जातो. रुग्णाची आर्थिक स्थिती, त्याची जात व धर्म याचा प्रतीक्षा यादीत त्याचे स्थान ठरवताना काही संबध नसतो. अवयवांचे वितरण हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या मार्फत पारदर्शकपणे होते.
मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या नातेवाईकांना अवयव कोणाला दिले आहेत हे कळू शकते का?
            नाही. नातेवाईकांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता सांगितला जात नाही.
अवयव दान केल्याने मस्तिष्क स्तंभ मृत दात्याच्या शरीरावर काही विद्रुपता येतो का?
            नाही. मस्तिष्क स्तंभ मृत्यू दात्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेवून त्याचे अवयव काळजीपुर्वक काढले जातात व शरीरावर विद्रुपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपुर्वक केली जाते तितक्याच काळजीपुर्वक रितीने अवयव काढल्या जातात व जखम पुन्हा शिवली जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.
अवयवदानाला धर्माची परवानगी आहे का?
            हो. भारतातील सर्वच धर्मांनी अवयवदानाला पाठिंबा दिला आहे व अवयवदान हे पुण्यांचे काम मानले जाते.
अवयवदान केल्यानंतर मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला काही मोबदला दिला जातो का?
            नाही. अवयवदानासाठी मस्तिष्क स्तंभ मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला आर्थिक अथवा कुठल्याही स्वरुपाचा मोबदला दिला जात नाही. म्हणून अवयवदान हे शुद्ध व श्रेष्ठदान ठरते. परंतु अवयवदानाला संमती दिल्यानंतर अवयवदानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांचा तसेच इतर काही वैद्यकिय खर्च मृताच्या नातेवाईकांना करावा लागत नाही.
अवयवदान करायची इच्छा असल्यास काय करावे?
            एखाद्या व्यक्तीस मृत्यू नंतर आपल्या अवयवांचे दान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर एखाद्या जवळच्या सज्ञान नातेवाईकाची सही घेणे देखील आवश्यक आहे. असा फॉर्म भरल्यावर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाईल. हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगावे. जेणेकरुन त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्रपरिवार त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या संमतीशिवाय अवयव दान होवू शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
            डोनर कार्ड व अवयव दानासाठी विभागवार संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे. मुंबई, 022-24028197, 9320063468, 9167663469, पुणे-9890210011, औरंगाबाद-0240-2333591, 9422713691, नागपुर-9423683350,  
00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती