Saturday, September 3, 2016

महा अवयवदान अभियान दि.30ऑगस्ट पासुन
*वैद्यकिय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग,
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांचा संयुक्त उपक्रम
       अमरावती,दि.29 (जिमाका): वैद्यकिय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण महाराष्ट्रात दि. 30 ऑगस्ट व 1 सप्टेंबर 16 रोजी महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानानिमित्त राज्य स्तरापासुन ते तालुका स्तरापर्यत विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकतीच मा. पंतप्रधान यांनी आकाशवाणी वरील मन की बात या कार्यक्रमामध्ये अवयव दानाचे महत्व सांगितले आहे.  
          महा अवयवदान अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाच्या वतीने दि. 30 ऑगस्ट 16 रोजी जागृती महाफेरी ने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. दि. 31 ऑगस्ट 16 रोजी कार्यशाळा, अवयवदान चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा, तसेच 1 सप्टेंबर रोजी नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार असुन या शिबीरामध्ये प्रत्यक्ष अवयवदान केलेल्या अवयवदात्या कुटुंबाचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन अवयव दान करण्याचे आवाहन जिल्हा अवयवदान अभियान समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले आहे.
          सद्य-परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मुत्रपिंड, 50 हजार यकृत, 2 हजाराहुन अधिक हृदय विकाराने ग्रस्त असुन या रुग्णांना अवयवाची गरज आहे. मुत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धीकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुफ्फुस विकारांनी त्रस्त रुग्णांना असा कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नाही. त्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे.
          जे नागरिक अवयवदानाचा संकल्प करु इच्छितात त्यांनी www.dmer.orgwww.ztccmumbai.org या वेबसाईट वर अवयवदानाचे कार्ड ऑनलाईन भरुन अवयवदान करण्याचा संकल्प करु शकतात. अधिक माहिती साठी 18002747444 व 1800114770 या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधू शकता.
00000

वाघ/कोल्हे/दि.29-08-2016/16.55 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...