गणेशोत्सवा दरम्यान आधार नोंदणीचा
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते शुभारंभ
रुक्मिणीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात
आधार नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद
ख्,        अमरावती,दि.6- लोकमान्य टिळकांनी समाजातील सर्व लोकांना एकत्र करुन सामाजिक व राष्ट्रीय महत्वाची कार्ये पार पाडण्याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यामुळे या गणेशोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाच्या माध्यमातून नागरिकांची आधार नोंदणी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असून त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते रुक्मिणीनगर येथील मराठा फ्रेंड्स क्लब मैदानावर आयोजिण्यात आलेल्या  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे करण्यात आला.

            यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी गित्ते यांनी श्रीगणेशाची आरती केली. मंडळाचे अध्यक्षप जगदिश बोंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तहसिल कार्यालयाच्या वतीने आधार कार्ड नोंदणीसाठी दोन संगणकाची व्यवस्था केली आहे. गणेशोत्सवास उपस्थित राहाणाऱ्या सर्व नागरिकांची येथे आधार नोंदणी करण्यात येणार आहे.

            जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात शहरी भागात 552 आणि ग्रामीण भागात 1151 असे एकुण 1703 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळाच्या माध्यमातून नागरिकांची आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत विशेष करुन शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी होईल असा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडळांनी त्यांच्या सोई नुसार ज्या दिवशी आधार कार्ड नोंदणी करण्यात येईल तो दिवस आणि वेळ निश्चित करुन तहसिल कार्यालयाकडे कळवायचे आहे. त्यानुसार तहसिल कार्यालयाकडून आधार नोंदणीसाठी आवश्यक यंत्रणा आणि साहित्य संबंधित गणेश मंडळाच्या ठिकाणी उपलब्ध असेल. रात्री उशिरा पर्यंतही ही नोंदणी सुरु ठेवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच ज्यांनी आतापर्यंत आधार कार्ड काढलेले नाही अशा सर्वांनी आपापल्या ठिकाणी जवळच्या गणेश मंडळाकडे जाऊन आधार कार्ड काढून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी गित्ते यांनी केले आहे.
            यावेळी येथील मैदानावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी आधार कार्ड नोंदणीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

            यावेळी तहसिलदार सुरेश बगळे, रुक्मीणीनगर सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी गुल्हाने, अंकुश डहाके आदी तसेच गणेश भक्त उपस्थित होते.
                                                            00000

काचावार/सागर/06-09-2016/18-00 वाजता



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती