Wednesday, September 21, 2016

शहिद जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
* पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली
* बंदुकीच्या फैरी झाडुन पोलिसांनी दिली मानवंदना

            अमरावती, दि.20 (जिमाका): जम्मु कश्मीर मधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला त्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील जवान पंजाब उर्फ विकास जानराव उईके हे शहिद झाले. नांदगाव खंडेश्वर येथील लाखानी मैदानावर शहिद जवान पंजाब उईके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

          महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शहिद पंजाब उईके यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. सैन्यदलाच्या वतीने कॅप्टन आशिष चंदेल, नायक सुभेदार एल.जी.ढोले, नायक सुभेदार एन.पी.जिवन तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते, पंजाब उईके यांचे वडील व आर्मीमध्ये सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक जानराव उईके यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडुन शहिद पंजाब उईके यांना मानवंदना देण्यात आली. शहिद पंजाब उईके यांच्या पार्थिवास त्यांचे छोटे बंधु विकास उईके यांनी अग्नी दिला. त्यानंतर उपस्थित हजारोंच्या जनसमुदायांनी दोन मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शेवटी सामुहिक राष्ट्रगीत झाले.   

          यावेळी शहिद पंजाब यांची आई सौ.बेबीताई उईके, बहिण सौ.प्रिती, लहान भाऊ विकास, जावाई गजानन इरपाते, खा.रामदास तडस, आ.डॉ.अनिल बोंडे, आ.बच्चु कडु, आ.विरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख, भाजप शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्ला.ले. रत्नाकर चरडे, उप विभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसिलदार वाहुरवाघ, चांदूर रेल्वेचे तहसिलदार राजगडकर, यांच्यासह नांदगाव खंडेश्वर व पंचक्रोशितील सुमारे दहा हजारच्या वर जनसमुदाय उपस्थित होता.
शहिद पंजाब च्या कुटुंबियांनी घेतले अखेरचे दर्शन

       बेलोरा विमानतळावरुन साधारण दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वरचे सुपुत्र व देशाचा जवान शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी सैन्य दलाच्या खास वाहनाने आणण्यात आले. तेथे शहिद पंजाब यांची आई सौ.बेबीताई, वडील जानराव, बहिण प्रितीताई, भाऊ विकास यांच्यासह उपस्थित सर्व आप्त, स्वकीयांनी दर्शन घेतले. शहिद पंजाब यांचे पार्थिव दर्शनासाठी काही काळ घरी ठेवण्यात आला होता. तेथेही पालकमंत्री प्रविण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ.डॉ.अनिल बोंडे, आ.विरेंद्र जगताप, आ.आशिष देशमुख आदिंनी पुष्प वाहुन श्रद्धांजली वाहिली व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांनी धार्मिक विधी केला. यावेळीही हजारोंच्या संख्येने महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

          सकाळी 11-15 वाजता सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने बेलोरा विमानतळावर शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव नागपूरहुन आणण्यात आले. पार्थिव आणल्यानंतर बेलोरा विमानतळावर पालकमंत्री प्रविण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, कॅप्टन आशिष चंदेल, राष्ट्रसेविका समितीच्या मधुरा पांडे, जिल्हा संघ चालक चंद्रशेखर भोंदु, निवेदिता दिघडे-चौधरी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

          सैन्यदलाच्या विशेष वाहनाने शहिद पंजाब उईके यांचे पार्थिव बेलोरा विमानतळावरुन नांदगाव खंडेश्वर येथे नेण्यात आले. नांदगाव खंडेश्वर येथे जात असतांना रस्त्यात धानोरा (गुरव), चोर माहुली तसेच अन्य गावात अबाल वृद्धांसह हजारोच्या संख्येनी पुष्पवृष्टी करुन अभिवादन केले. आपल्या देशासाठी शहिद झालेल्या लाडक्या जवानाला साश्रूनयनांनी निरोप दिला. अमरावती शहरापासुन नांदगाव खंडेश्वर पर्यंत विविध ठिकाणी फलक लावुन शहिद पंजाब उईके यांना आदरांजली वाहिली.
00000
काचावार/गावंडे/सागर/झिमटे/खंडारकर/हरदुले/20-09-2016/17-25 वाजता






















No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...