पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्र्यांना पत्र तूरखरेदीची 1 महिना मुदत वाढवावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव नाफेड खरेदी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे तूर खरेदीची मुदत 31 मेपर्यंत वाढविण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

तसे निवेदन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री महोदयांना पाठविले आहे. जिल्ह्यात तूर हे प्रमुख पीक असून, तूर उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकरी बांधवांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचता येऊ शकले नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही बाब पालकमंत्र्यांनी तत्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री व महसूल मंत्र्यांकडे निवेदन पाठवून व चर्चा करून त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

राज्यात नाफेडअंतर्गत तूर खरेदी करण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. मात्र, महाराष्ट्रात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे संचारबंदीत अनेक शेतकरी बांधव तूर विक्रीसाठी नाफेड खरेदी केंद्रावर पोहोचू शकले नाही. पर्यायाने ब-याच शेतक-यांची तूर ही सद्य:स्थितीत त्यांच्या घरी आहे. सदर स्थितीचा विचार करता नाफेडअंतर्गत तूर खरेदीची मुदत 31 मे पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतक-यांची तूर संपूर्ण महिन्यामध्ये खरेदी केली जाईल.

जिल्ह्यात 12 तूर खरेदी केंद्रे आहेत. खरेदी प्रक्रियेत कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आदी सर्व उपायांची दक्षतापूर्वक अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत अधिक वेळ द्यावा लागत आहे. खबरदारी म्हणून रोजच्या व्यवहाराच्या संख्येवरही मर्यादा आणण्यात आली आहे. त्यात संचारबंदी असल्याने अनेक शेतकरी बांधवांना तूर खरेदी केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती