Tuesday, April 7, 2020

अमरावतीत कोविड-19 डायग्नोसिस सेंटरचा प्रस्ताव - पालकमंत्री यशोमती ठाकूर




अमरावती, दि. 7 :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राथम्याने चाचणी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार  अमरावतीत कोविड- 19 डायग्नोसिस सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठक झाली, त्यात अमरावती येथून पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अत्यावश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने विविध निर्णय या बैठकीत झाले. त्यात अमरावती येथे कोविड-19 डायग्नोसिस सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी मांडला आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सध्या कोरोना संशयितांची संख्या वाढतच चालली आहे. त्या तुलनेत चाचणी अहवाल तत्काळ मिळण्यासाठी  लॅबची संख्या वाढणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच अमरावतीत कोविड-19 डायग्नोसिस सेंटर सुरू व्हावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने हे निदान केंद्र सुरू होऊ शकेल. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या निकषाप्रमाणे आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
जैव सुरक्षिततेसाठी निश्चित श्रेणीनुसार (लेव्हल 2) प्रशिक्षित मनुष्यबळ, मेडिकल स्टाफ, तंत्रज्ञ व तज्ज्ञांची उपलब्धता आहे. यासाठी आवश्यक कॅबिनेट, किटस् व इतर यंत्रणा, त्याचप्रमाणे, एनआयव्ही व आयसीएमआर यांची परवानगी आदी प्रक्रियेबाबत मान्यता मागितली आहे. सुमारे 35 लाख रूपये निधीतून ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल. त्यामुळे तत्काळ चाचणी अहवाल मिळू शकतील व कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व आवश्यक पावले शासन उचलत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात सद्य:स्थितीत अद्यापपर्यंत 3 हजार 923 नागरिकांची तपासणी झाली. अद्यापपर्यंत 235 नागरिकांचे थ्रोट स्वॅब नमुने पाठविण्यात आले. त्यानुसार 97 अहवाल निगेटिव्ह आहेत. 11 अहवाल रिजेक्टेड आहेत. अद्यापपर्यंत 126 चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे अमरावतीत प्रयोगशाळा झाल्यास उपयुक्त ठरेल व तातडीच्या उपाययोजनांतून साथरोगावर तत्काळ नियंत्रण शक्य होईल.
त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या मंत्री मंडळ बैठकीत केशरी शिधापत्रिकाधारकांना एप्रिल ते जून 2020 या काळात सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्याबाबत निर्णय झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागाला यापूर्वीच स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत अडीच हजार मेट्रिक टनहून अधिक धान्याचे वाटप झाले. ही प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. यात स्वस्त धान्य दुकानदार किंवा कुणाही व्यावसायिकाने काळा बाजार केल्यास खपवून घेतले जाणार नाही. असा प्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री मंडळ बैठकीत शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रूपये इतक्या अल्प दरात शिवभोजन देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 425 शिवभोजन थाळ्यांच्या वितरणाला मान्यता देण्यात आली आहे,  
त्या पुढे म्हणाल्या की,  कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात सामाजिक सुरक्षिततेच्या हेतूने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य नागरिकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपाची वेळ 8 ते 2 अशी मर्यादित करण्यात आली आहे. गर्दी टाळावी व नागरिक सुरक्षित राहावेत, हा त्यामागचा हेतू आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची वाहने मात्र इतर वेळेत इंधन भरू शकतील.  या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वेळेचे गांभीर्य ओळखून सर्वांनी दक्षता घ्यावी. सर्वांनी मिळून दक्षता घेतल्यास या संकटावर आपण मात करू शकू. त्यामुळे गर्दी टाळावी व सोशल डिस्टन्सिंग राखावे, असे आवाहन त्यांनी केले.
                                                              000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...