जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्ह्यात 14 हजार 78 मेट्रिक टन अन्नधान्य वाटप सुरु


            अमरावती, दि. 11 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी 14 एप्रिलनंतरही कायम राहणार आहे. त्यामुळे या काळात सर्वांनीच संयम व शिस्त पाळणे आवश्यक आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील. त्यामुळे कुठलीही काळजी न करता योग्य दक्षता घेऊन आपले स्वास्थ्य जपावे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. या काळात जिल्ह्यातील गरजू, वंचित घटकांतील नागरिकांना अन्नधान्याचा वेळेत पुरवठा व्हावा, यासाठी पुरवठा विभागाला गतिमान कार्यवाहीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.  
जिल्ह्यातील स्थितीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर रोज प्रशासनाकडून माहिती व आढावा घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, एका मयत पॉझिटिव्ह नागरिकाच्या संपर्कातील 4 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. या चौघांवर कोविड रुग्णालयात उपचार होत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात 4 हजार 335 नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून 343 थ्रोट स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 262 नमुने निगेटिव्ह आहेत. एकूण 19 रिजेक्टेड व 57  प्रलंबित आहेत. आज 50 स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. अत्यंत काळजीपूर्वक तपासणीची कार्यवाही होत आहे. आवश्यक वाटल्यास पुन:चाचणी केली जात आहे.  
या काळात एकही नागरिक अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
जिल्ह्यात सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे अद्यापपावेतो 14 हजार 78 मेट्रिक टनहून अधिक अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून, ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण होत आहे. सुमारे पाच लाख 34 हजार 252 शिधापत्रिकाधारकांना 14 हजार 78 मेट्रिक टन नियतन प्राप्त झाले आहे. या सर्व धान्याची एफसीआयकडून उचल झाली आहे. सुमारे ११ हजार २६६ मेट्रिक टन धान्य दुकानात पोहोचविण्यात आले आहे. दुकानातून वितरण सुरु आहे. यात अंत्योदय योजना, प्राधान्य गट योजना, एपीएल शेतकरी योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना धान्य वितरणाची कार्यवाही गतीने व्हावी. रास्त भाव दुकानांतून सोशल डिस्टन्सिंग व इतर आवश्यक दक्षता घेतली जावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेतील सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती पाच किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरीत करण्याचे निर्देश आहेत.  त्यासाठी ९ हजार ६०० मेट्रिक टन तांदळाचे नियतन प्राप्त झाले असून त्यापैकी ४ हजार ५६० मेट्रिक टन तांदळाची उचल पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित उचलही तत्काळ करून घ्यावी, त्याचप्रमाणे, सर्व धान्य दुकानांत पोहोचवून पात्र शिधापत्रिका धारकांना वितरण गतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बाजाराच्या विकेंद्रीकरणाची कार्यवाही होत आहे. पर्यायी जागांवरही सोशल डिन्स्टन्सिंग व इतर सूचनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या काळात कुठलीही हलगर्जी होता कामा नये, असेही निर्देश त्यांनी दिले.
 संचारबंदीचा कालावधी वाढणार असला तरीही आपण सर्वजण मिळून या काळात आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करून या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की,  या काळात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना सर्व साधने उपलब्ध देण्यासह त्यांचे मनोबलही वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी चुकीची माहिती, अफवा प्रसारित होता कामा नयेत. सर्वांनी मिळून सजग राहून या आपत्तीचा सामना करणे आवश्यक आहे. हा आपल्या सर्वांचीच परीक्षा पाहणारा काळ आहे. मात्र, आपण संयम व शिस्त पाळून त्यात निश्चितपणे बाहेर पडू, असेही त्यांनी सांगितले.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती