Tuesday, April 14, 2020

नियमभंग करणा-यांवर कठोर कारवाई करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


         अमरावती, दि. 14 :  कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले असून, यासंदर्भातील आदेशांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. हा नागरिकांच्या जिविताचा व सुरक्षिततेचा प्रश्न असून, नियमभंग करणा-यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.
         कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री ॲड. ठाकूर या रोज प्रशासनाकडून माहिती व आढावा घेत आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत वाढल्याच्या पार्श्वभूमीवर विविध आदेश जारी करण्यात आले आहेत. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी ही अत्यंत महत्वाची कार्यवाही असून, तिची अंमलबजावणी तितक्याच प्रभावीपणे होणे गरजेचे आहे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्या म्हणाल्या की,  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, 4 हजार 609 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकी एका निधन झालेल्या व्यक्तीचा अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आला होता. त्याशिवाय, त्यांच्या संपर्कातील चौघाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर उपचार होत आहेत. आपली वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट आदी सर्व अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
            त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार आतापर्यंत स्वॅब तपासणीसाठी 414 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील 300 नमुन्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 20 अहवाल रिजेक्टेड असून, त्यातील 13 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. 89 अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, वैद्यकीय पथकांकडून सर्वदूर तपासण्या होत असून, आवश्यक तिथे थ्रोट स्वॅबही घेण्यात येत आहेत. चाचणी अहवाल लवकर मिळावेत, यासाठी अमरावतीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन ठिकाणी प्रयोगशाळा लवकरच सुरू होतील.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये, तर सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ सेंटर तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. कोविड हेल्थ सेंटरही सुरु करण्यात येत असून, सर्व सुविधा अद्ययावत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
           त्या पुढे म्हणाल्या की, तपासणी मोहिम अधिक व्यापक व काटेकोर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. संस्थात्मक अलगीकरण केंद्र, निवारा शिबिरे याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविल्या जाव्यात.  ग्रामस्तरावरील कार्यवाहीही काटेकोरपणे झाली पाहिजे.  ग्रामसेवक, आशा वर्कर,  अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले आहे. त्या प्राप्त माहितीनुसार योग्य कार्यवाही व्हावी.  जिल्हा यंत्रणेच्या सूचनेनुसार तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी समन्वय ठेवून सर्व कामे नियोजनपूर्वक करावीत. ग्रामीण भागात धान्य वाटप सुरु आहे. त्याठिकाणी गर्दी होणार नाही. सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.  
काही विघ्नसंतोषी लोक समाजमाध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढदुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. कोरोना साथीमुळे  असलेल्या लॉकडाऊनदरम्यान याचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून दक्षता पाळूया व या संकटाचा यशस्वीपणे सामना करूया, असेही आवाहन त्यांनी केले.
                             000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...