Thursday, April 2, 2020

आरोग्य विभागाच्या पथकांना खरी माहिती पुरवून सहकार्य करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन

अमरावतीकर, मात करुया कोरोनावर विशेष मोहिमची सुरूवात


अमरावती, दि. 2:  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्यात विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसह अमरावतीकर, मात करुया कोरोनावर या विशेष मोहिमेची जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास असणाऱ्या रुग्णांना शोधून त्यांची तपासणी करत आहेत. नागरिकांनी घरी येणाऱ्या पथकांना खरी माहिती देऊन कोव्हिड-19 आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
शहरातील मुस्लिमबहुल क्षेत्रातील नगरसेवक, मौलवी, प्रतिष्ठित व्यक्ती यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहिमेची अंमलबजावणी संदर्भात तातडीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तौसिफ काजी,‍ शिक्षणाधिकारी अब्दुल राजिक,  मौलाना मुश्ताक अशरफी, नाजिमोद्दीन अन्सारी, हाफिज हकिम, मौलाना मुश्फिक, नगरसेवक सलीम बेग, अब्दुल नाजिम, अकील पहलवान यांच्यासह अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, नागरिकांनी मोहिमेअंतर्गत घरी येणाऱ्या आरोग्य पथकाला कुठलीही माहिती न लपविता व्यवस्थित व खरी माहिती देऊन सहकार्य करावे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे. सहकार्य ठेवावे. प्रशासनाला सहकार्य न केल्यास यापेक्षाही कठोर पावले उचलावी लागतील.  त्यामुळे तपासणीला सहकार्य करावे. नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठीच ही मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे समाजातील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्तींनी  नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
         श्री. नवाल म्हणाले की, परदेशातून तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी अलगीकरण निवारे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी त्यांची जिल्हा प्रशासनाव्दारे निवासाची व भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत जो ज्या ठिकाणी आहे, त्यांनी त्याच ठिकाणी राहण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत, जेणेकरुन जिल्ह्यातील इतर व्यक्तींना व त्यांच्या कुटुबींयांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये. कारण, कोव्हिड- 19 या आजारातील विषाणू हे चौदा दिवसापर्यंत संशयित व्यक्तींच्या शरीरात राहतात. कोरोना विषाणूची चाचणी केल्यावर संबंधिताला चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते.
  अमरावतीकर, मात करुया कोरोनावर या मोहिमेत महानगरपालिका स्तरावर वॉर्डनिहाय व नगर पंचायत स्तरावर वॉर्ड व गटनिहाय तसेच ग्रामीण स्तरावर गावनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या वैद्यकीय पथकाव्दारे घरोघरी जाऊन नागरिकांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची काही महत्वपूर्ण निकषांच्या आधारे प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. तपासणी करुन आवश्यक सर्व माहिती पथकाकडून विवरणपत्रात संकलित केली जात आहे. त्यासाठी सहकार्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
            कुटुंबातील व्यक्तींना मागील तीन दिवसात ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास झालेला आहे का , वृध्द व्यक्तींना काही त्रास होत येत आहे का, दिव्यांग व्यक्तींना काही त्रास होत येत आहे का, कुटुंबातील कोणती व्यक्ती विदेशातून अथवा पुणे, मुंबई, दिल्ली येथून आली आहे का, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोव्हीड- 19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेली आहे का, आदी माहिती पथकांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कुटुंबातील सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूसंदर्भात तपासणी करण्यात येणार असून त्याबाबत काही लक्षणे व त्रास आढळून आल्यास तात्काळ त्यांच्यावर आरोग्‍य विभागाच्या यंत्रणेमार्फत उपचार करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वॉर्डनिहाय व लोकसंख्यानिहाय पथक गठित करुन माहिती गोळा करावी. तसेच गठित पथकाने घरोघरी जाऊन उपरोक्त प्रश्नावलीनुसार माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...