Wednesday, April 1, 2020

अमरावतीकर, मात करुया कोरोनावर जिल्हा प्रशासनाच्या विशेष मोहिमेचा आज शुभारंभ - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्ह्यात विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून जिल्ह्यात 2 ते 6 एप्रिल या कालावधीत अमरावतीकर, मात करुया कोरोनावर ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास असणाऱ्या रुग्णांना शोधून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे जेणेकरून प्राथमिक अवस्थेतील रुग्णांचा शोध घेता येईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.
अमरावतीकर, मात करुया कोरोनावर या मोहिमेत महानगरपालिका स्तरावर वॉर्डनिहाय व नगर पंचायत स्तरावर वॉर्ड व गटनिहाय तसेच ग्रामीण स्तरावर गावनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येणार आहे. या वैद्यकीय पथकाव्दारे घरोघरी जाऊन नागरिकांची व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची काही महत्वपूर्ण निकषांच्या आधारे प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी करुन आवश्यक सर्व माहिती पथकाकडून विवरणपत्रात संकलित केली जाईल.
कुटुंबातील व्यक्तींना मागील तीन दिवसात ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास झालेला आहे का , वृध्द व्यक्तींना काही त्रास होत येत आहे का, दिव्यांग व्यक्तींना काही त्रास होत येत आहे का, कुटुंबातील कोणती व्यक्ती विदेशातून अथवा पुणे, मुंबई, दिल्ली येथून आली आहे का, कुटुंबातील कोणी व्यक्ती कोव्हीड- 19 च्या रुग्णांच्या संपर्कात आलेली आहे का, आदी माहिती भरून ही विवरणपत्रे पथकांकडून जिल्हा प्रशासनाला केली जातील.
कुटुंबातील सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूसंदर्भात तपासणी करण्यात येणार असून त्याबाबत काही लक्षणे व त्रास आढळून आल्यास तात्काळ त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत उपचार करण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी वॉर्डनिहाय व लोकसंख्यानिहाय पथक गठित करुन माहिती गोळा करावी. तसेच गठित पथकाने घरोघरी जाऊन उपरोक्त प्रश्नावलीनुसार माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामीण व नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे संनियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असून, जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्यांना सहायक अधिकारी म्हणून काम पाहतील. पथकामध्ये डॉक्टरांची कमतरता भासल्यास स्थानिक डॉक्टरांची सेवा घ्यावी व त्यांना नियमानुसार वेतन अदा करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मोहिमेत तपासणीच्या दरम्यान वरील नमूद लक्षणे आढळून आल्यास सदर रुग्णाची नियमित तपासणी फिव्हर क्लिनीकमध्ये करावी. या फिव्हर क्लिनीकची माहिती उदा. क्लिनीक प्रमुख मोबाईल क्रमांक आदी नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिध्द करावे. वरील सर्व तपासणीचे काम व आवश्यक माहिती गोळा करण्याचे कामकाज हे विहीत मुदतीत पूर्ण करावे, तसेच केलेल्या कामकाजाचा दैनंदिन अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. नागरिकांनीही आरोग्य पथकांना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...