कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग- व्यवसाय सुरू होणार आवश्यक विकासकामे व उद्योग- व्यवसायांना गती - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



अमरावती, दि. 19 :   _जिल्ह्यात उद्यापासून (20 एप्रिल)पासून कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांतकाही उद्योग- व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या काळात जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार आहेत.  यानुसार सुरु होत असलेल्या उद्योग व व्यवसायांतून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन व्हावे, त्याचप्रमाणे, नागरिकांनीही गर्दी टाळून दक्षता पाळावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे._
पालकमंत्री श्रीमती ठाकूर या प्रशासनाकडून होणा-या कार्यवाहीची रोज माहिती व आढावा घेत आहेत. कोरोना संकटामुळे अनेक उद्योग- व्यवसायांचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही 246 उद्योग- व्यवसाय सुरू होतील. मात्र,  या काळात संबंधित उद्योग व व्यवसायाने आपले अधिकारी व कर्मचारी यांची पूर्णत:  काळजी घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
      त्या म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, शेतमाल, शेतीविषयक कामे हे यापूर्वीच सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक उद्योग- व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी कोरोनाच्या प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना दक्षता पाळून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. उद्योजक-कारखानदारांनी आपल्या कर्मचारी,कामगारांची काळजी घ्यावी. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यासाठी विविध विभागांच्या अधिका-यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजनेत कक्षही स्थापन  करण्यात आला आहे.
       पाणीपुरवठ्यासह आवश्यक सेवा सुरू राहाव्यात व आवश्यक विकासकामांना गती मिळावी, यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आवश्यक कामे, पांदणरस्ते आदी कामांची परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीमधील व औद्योगिक वसाहतीबाहेरील बाहेरील उद्योगही सुरू होतील. संबंधित उद्योजक, कंत्राटदार, व्यावसायिक यांनी आपले कामगार, कर्मचारी यांची सुरक्षितता राखावी, असे निर्देश त्यांनी दिले.
     त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात काल एक आणखी पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने 1 मयत व्यक्तीसह पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 6 झाली आहे. या पार्श्वभूमीवर सदर परिसर सील करण्यात आला असून, तपासण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार अद्यापपर्यंत 5 हजार 163 नागरिकांची तपासणी होऊन 557 नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील 57 नमुने प्रलंबित आहेत. दरम्यान, 44 नमुने रिजेक्टेड आले असले तरी 37 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. कुठेही शंकेला वाव राहू नये, काटेकोर तपासणी व्हावी व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, असा त्याचा हेतू आहे.
नागरिकांनीही या काळात दक्षता पाळावी. बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे. सर्दी , ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण बरे होऊन घरी जातात. त्यामुळे कुठलीही शंका आली तर तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.   
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती