Monday, April 27, 2020

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा खरीप नियोजन आढावा बैठक



अमरावती, दि. 27 : अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 च्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक (29 एप्रिल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनात होणार आहे.  
या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृषी अधिका-यांशी चर्चा करून माहिती घेतली व परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. बैठकीस सर्व संबंधित अधिका-यांनी संपूर्ण सविस्तर माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी, विविध उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून पूर्वतयारीची माहिती घेतली.
खरीप नियोजनाच्या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन, खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणी क्षेत्र, बियाणे नियोजन, खत पुरवठा, प्रमुख पीकाची प्रस्तावित उत्पादकता, गुण नियंत्रण कामाचे नियोजन व कार्यवाही, कृषी विभागातील विविध योजना व प्रकल्पांची माहिती , नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती निधी, पीक कर्ज, सिंचन क्षमता, कृषी वीजपुरवठा, जिल्ह्यात राबविण्यात आलेले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आदी विविध विषयांचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर या घेणार आहेत.
जिल्ह्यात 12.21 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून, लागवडीलायक क्षेत्र 7.81 लाख हेक्टर आहे. सरासरी खरीप क्षेत्र 7.28 लाख हेक्टर आहे. लागवडीलायक क्षेत्राच्या तुलनेत त्याची टक्केवारी 93 टक्के आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी, उडीद ही प्रमुख पीके आहेत. प्रस्तावित पेरणी क्षेत्रानुसार बियाणे नियोजन व खतपुरवठा, पीक कर्ज, सिंचन सुविधा व इतर आवश्यक बाबींचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत.
जिल्ह्यात लागवडीलायक जमीनीच्या 7. 81 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 1.60 लाख हेक्टर इतके क्षेत्र खारपाणपट्ट्यात मोडते. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 13 टक्के इतके त्याचे प्रमाण आहे. या क्षेत्रात 355 गावांचा समावेश आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 7.28 लाख हेक्टर असून, सरासरी क्षेत्राच्या 100 टक्के क्षेत्रावर प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे. पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीत त्यावर चर्चा व निर्णय होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.
जिल्ह्यात यापूर्वी मेळघाटात कोदो, कुटकी या भरडधान्य पिकांची प्रात्यक्षिके, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यात ओवा पिकांची प्रात्यक्षिके, तसेच, विस्तार, आत्मा, पोकरांतर्गत 1 हजार 304 शेतीशाळा आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. अशा उपक्रमांबाबतही नियोजन केले जाईल. कापूस या पीकाचे प्रस्तावित क्षेत्र 2 लाख 61 हजार हेक्टर, सोयाबीनचे 2 लाख 68 हजार हेक्टर व तुरीचे 1 लाख 10 हजार हेक्टर, तर मूग व ज्वारीचे प्रत्येकी 30 हजार हेक्टर प्रस्तावित आहे. त्यानुसार निविष्ठा व इतर साधनसामुग्री, विविध योजनांची अंमलबजावणी आदी बाबींचा आढावा पालकमंत्री श्रीमती ठाकूर घेणार आहेत.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...