पाणी टंचाई संदर्भातील कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



अमरावती, दि. 16 : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. तथापि, या काळात जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. कुठेही पाणीटंचाई उद्भवता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून नियमितपणे आढावा घेतला जात आहे. त्याचअनुषंगाने इतरही आवश्यक बाबींचा आढावा त्यांच्याकडून घेतला जात आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता ग्रामीण भागात पाणीटंचाई उद्भवता कामा नये. यासाठी आवश्यक उपाययोजना व्हाव्यात. तातडीची गरज लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठ्याची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत.  आवश्यक तिथे टँकर आदी सुविधा असाव्यात. सर्व आवश्यक दक्षता घेऊन ही कामे पूर्ण व्हावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
      कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी व्यापक व काटेकोर तपासणीचे निर्देश  प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार शहरातील वॉर्डावॉर्डात फिरत्या रूग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या परिसरात ही मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात एका फिरत्या रूग्णालयात एक डॉक्टर आणि नर्स जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. सुरुवातीला ही योजना बफर झोन परिसरात राबविण्यात येत आहे. त्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन आरोग्य तपासणी  करण्यात  येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
        पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने सर्वदूर तपासणी, फीव्हर क्लिनीक आदी उपाययोजना होत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, अद्यापपर्यंत 465 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यात एका मयत व्यक्तीचा आणि त्यांच्या संपर्कातील चारजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चारजणांवर कोविड रूग्णालयात उपचार होत आहेत. थ्रोट स्वॅब घेतलेल्या 465 व्यक्तींपैकी 358 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  63 अहवाल प्रलंबित आहेत. 39 अहवाल रिजेक्टेड असले तरी त्यातील 32 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. कुठेही शंकेला वाव राहू नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे.
       त्या पुढे म्हणाल्या कीया संकटकाळात कृषी क्षेत्राला उभारी देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना कृषी निविष्ठा पुरविणे व कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती देणे आवश्यक असल्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित खात्यांच्या मंत्री महोदयांना केली आहे.
शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. शेतीउत्पादनांची खरेदी करणाऱ्या (किमान हमी दरासह) संस्था, विशेषतः कापूस आणि तूर डाळ यांची खरेदी करणाऱ्या संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेली मंडी, शेती आणि फुलशेतीउत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक, बी-बियाणे, खते, आणि कीटकनाशके यांचे उत्पादन आणि पॅकेजिंग अशा शेतीशी संबंधित अनेक कामांना लॉकडाऊनमधून सूट देऊन शेतकरीहिताचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्याचप्रमाणे, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्याचा निर्णय घेतला आहे. मेळघाटात ही कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत.  अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस खूप चांगले काम करत आहेत. सर्वेक्षणात त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. त्याशिवाय, त्या घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन तसेच बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 
लॉकडाऊनचा कालावधी वाढला असला तरी विविध लोकहितकारी निर्णयांतून राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. या काळात नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधासाठी  दक्षता घेऊन आपले कर्तव्य पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.  

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती