पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


निवारा केंद्रांत कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना
      घरी पोहोचविण्याबाबत निर्णय व्हावा
-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 13 :   कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लागू असलेल्या संचारबंदीमुळे अडकलेल्या नागरिकांची व्यवस्था विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांत करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून हे नागरिक घरापासून दूर आहेत. त्यामुळे कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविण्याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 पालकमंत्री श्रीमती ठाकूर या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती घेऊन आवश्यक दिशानिर्देश देत आहेत. त्या सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.  लॉकडाऊनमुळे  गेल्या 20 दिवसांपासून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे रोजगार बूडत असल्याने व त्यातही मोलमजूरी करुन चरितार्थ चालविणार्या वर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यात कुठलाही अडथळा येऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
त्याच अनुषंगाने निवारा केंद्रांवर परराज्यातील, जिल्ह्याबाहेरील अनेक कामगार बांधव, रोजगार, व्यवसायानिमित्त आलेले नागरिक थांबलेले आहेत. हे नागरिक अनेक दिवसांपासून आपल्या घर, कुटुंबापासून दूर आहेत. त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील नागरिकही इतर जिल्ह्यांतील निवारा केंद्रात थांबलेले आहेत. सध्या लॉकडाऊनचा कालावधी वाढलेला आहे. या काळात निवारा केंद्रात थांबून संसर्ग प्रतिबंधासाठीचा आवश्यक विहित कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे जाण्याची परवानगी मिळाल्यास व तशी व्यवस्था शासनाकडून होऊ शकल्यास त्यांच्यासाठी ते हिताचे होईल. त्याचप्रमाणे, निवारा केंद्रांतील संख्या मर्यादित राहील व प्रशासनावरही ताण येणार नाही. त्यामुळे सदर नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे, असा प्रस्ताव पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे दूरध्वनीवरून चर्चा करून मांडला. त्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी नागरिकांच्या स्थलांतरावर प्रतिबंध घालण्यात येऊन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था निवारा केंद्राद्वारे करण्यात आली आहे.  व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांचीही मोठी मदत होत आहे. पालकमंत्र्यांनी यापूर्वी विविध तालुक्यांना भेटी देऊन तेथील यंत्रणेचा आढावा घेतला आहे. विविध ठिकाणच्या निवारा केंद्रांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबलही त्यांनी वाढवले.  जिल्ह्यात 14 शासकीय व  इतर संस्थांच्या मदतीने तयार केलेल्या 29 अशा एकूण 34 निवारागृहांत पाच हजार 592 प्रवासी नागरिक, मजूर बांधवांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
             पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार जिल्ह्यात एका मयत व्यक्तीसह पाच व्यक्तींचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त आहेत. तपासणी व चाचणी प्रक्रिया अधिक काटेकोर व व्यापकपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 409 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 271 नमुने निगेटिव्ह आहेत. त्याशिवाय, अद्यापपावेतो 113 अहवाल प्रलंबित आहेत. 20 अहवाल रिजेक्टेड आहेत, तथापि, त्यातील 13 हे पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. आज 21 थ्रोट स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद व इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने वैद्यकीय पथके निर्माण करण्यात आली असून, आवश्यक तपासणी, चाचणी प्रक्रिया होत आहे.
             त्या म्हणाल्या कीया पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी वाढला असला तरी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून घरातच थांबणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे असा नियमभंग करणा-यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
ही लढाई कुणा एकट्याची नाही, ती सर्वांची आहे. आपण सर्वांनी मिळून हा लढा लढायचा आहे.  लॉकडाऊनच्या कालावधीत नियमांचे पालन झालेच पाहिजे. तेच सर्वांच्या हिताचे आहे. संयम आणि शिस्तीनेच हा लढा आपण जिंकू शकू, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती