प्रवासी नागरिकांसाठी धारणीत रंगभवन येथे व्यवस्था स्वयंसेवी संस्थांनी सहकार्यासाठी पुढे यावे - सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी


संचारबंदीमुळे धारणी तालुक्यात अडकलेल्या मजूर, प्रवासी नागरिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था रंगभवन व शासकीय वसतिगृहात करण्यात आली आहे. रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जात आहे. या उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी केले आहे.
प्रवासी नागरिकांची व्यवस्था रंगभवन व वसतिगृहात होत आहे. स्वयंसेवी संस्थांची मदतही मिळत आहे. सेंट्रल किचनही तयार करण्यात येत आहे. इतरही मान्यवर व संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे. नायब तहसीलदार ए. टी. गाजरे (संपर्क : 9075690811) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात येत असून, इच्छूकांनी अव्वल कारकून सत्यजीत थोरात यांच्या 9270142170 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही श्रीमती सेठी यांनी केले.
रोजगार हमी योजनेत सर्व गावांमध्ये योग्य ती काळजी घेऊन कामे चालू करण्याबाबत सर्व यंत्रणांना तसेच गटविकास अधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी मजुरांनी योग्य अंतर ठेवावे. दक्षता म्हणून तोंडाला रूमाल बांधणे, स्वच्छता आदी उपायांबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश श्रीमती सेठी यांनी दिले आहेत.
लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये म्हणून धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदान व जि. प. हायस्कूलसमोरील मैदानावर स्वतंत्रपणे जीवनावश्यक वस्तू विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुकानांमध्ये अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार किंवा चढ्या भावाने विक्री होऊ नये, यासाठी रास्त भावाचा फलक दुकानाबाहेर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुणीही चढ्या भावाने विक्री करत असल्यास नगरपालिका, पंचायत समिती किंवा उपविभागीय कार्यालयाकडे तक्रार करावी. धारणी तालुक्यात अद्यापि एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. चुकीची माहिती प्रसारित करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती