Friday, April 10, 2020

आरोग्य कर्मचा-यांना पुरेशी साधने उपलब्ध करून द्यावीत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                                    खंबीर राहून परिस्थितीवर मात करू
        

अमरावती, दि. 10 : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने त्यांची काळजी घेण्याचे घ्यावी. आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देतानाच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपण सर्वजण खंबीर राहून याही परिस्थितीवर मात करू, असा विश्वास आज व्यक्त केला.
कोरोना प्रादुर्भावामुळे विविध उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून रोज परिस्थितीची माहिती व आढावा प्रशासनाकडून घेतला जात आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, जिल्ह्यात अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार एक मयत नागरिक व त्याच्या संपर्कातील 3 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. या तिघांवर उपचार होत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात 4 हजार 204 नागरिकांची तपासणी होऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यातून 293 थ्रोट स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 215 नमुने निगेटिव्ह आहेत. एकूण 31 रिजेक्टेड व 43  प्रलंबित आहेत. आज 24 स्वॅब नमुने पाठविण्यात आले आहेत. अत्यंत काळजीपूर्वक तपासणीची कार्यवाही होत आहे. आवश्यक वाटल्यास पुन:चाचणी केली जात आहे. शंकेला वाव राहू नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, हा त्यामागील हेतू आहे.
त्याशिवाय, अमरावतीकर, मात करूया कोरोनावर या मोहिमेत 24 लाख नागरिकांशी संपर्क झाला असून, त्यात सर्दी, ताप, खोकला यापैकी कुठलेही एक लक्षण आढळलेल्या प्रत्येक नागरिकाशी नियमित संपर्क ठेवून योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपचार आदी कार्यवाहीसाठी स्वतंत्र कॉल सेंटर्स सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या काळात रुग्णालयात काम करणाऱ्या व रुग्णांना हाताळणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी,
कामगारांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून देणे व त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. शासकीय रूग्णालयाप्रमाणेच खासगी रूग्णालयांनीही ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कर्मचा-यांना एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर आवश्यक साधने उपलब्ध करुन द्यावीत,  रुग्णालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना पुरेशी विश्रांती मिळेल याची दक्षता घेण्यात यावी,  रुग्णालयात काम करणा-या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करावे व  रुग्णालयांत काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी, कामगार यांना कर्तव्यावर उपस्थित होण्याकरीता वाहतूकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्यास त्यांच्याकरिता वाहतुकीची व्यवस्था करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.  
  या पार्श्वभूमीवर राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचेही आव्हान शासनापुढे आहे. त्यामुळे बचतीसह अनेक नवे निर्णय शासनाकडून घेतले आहेत. विधीमंडळ सदस्यांच्या वेतनात एक वर्षभर 30 टक्के कपात करण्याचा स्वागतार्ह निर्णयही शासनाने घेतला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांत विविध कामांसाठी उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांचेही योगदान मिळत आहे. इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मदतकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांनी गर्दी टाळावी. शक्यतो घराबाहेर पडू नये, आवश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...