पालकमंत्री यांच्याकडून तिवसा येथील परिस्थितीचा आढावा


सुविधांपासून कुणीही वंचित राहता कामा नये
पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर

        अमरावती, दि. 02 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. या कालावधीत नागरीकांच्या सुरक्षिततेसह त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित ठेवण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे दिले.
            तिवसा तहसील कार्यालयात प्रशासनाची बैठक घेऊन विविध निर्देश त्यांनी दिले. नगराध्यक्ष वैभव वानखडे,उपसभापती शरद वानखडे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे,संध्या पखाले,हिमानी भोसले,शिवा तिखाडे,रवींद्र हांडे, संदीप आमले, लोकेश केणे, तहसीलदार वैभव फरतारे,मुख्याधिकारी पल्लवी सोटे,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर उपस्थित होते
            प्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिवसा येथील नागरीकांच्या तपासण्या, क्वारंटाईनस्थिती, आरोग्य सुविधा आदींचा आढावा घेतला.  त्यानुसार तिवसा नगरपंचायती अंतर्गत 176 नागरीक व तालुक्यात 1778 नागरीक होम क्वारंटाईन आहेत. मास्कची मागणी लक्षात घेता बचत गटांना काम देण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्राधान्याने मास्क देण्यात यावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
             निराधार नागरीकांना नियमित धान्य पुरवठा व्हावा या हेतूने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. त्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले. मध्यप्रदेशातून काही कामगार शेतात मजुरीसाठी येत असतात. संचारबंदीमुळे ते येथेच थांबले आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तू आदींचा पुरवठा करण्यात येत आहे. कुणीही वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
            तिवसा येथे सामाजिक न्याय भवनात प्रवासी नागरीकांसाठी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचीही पाहणी पालकमंत्र्यांनी यावेळी केली व तेथील नागरीकांशी संवाद साधला. या निवाराकेंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती