प्रवासी नागरिकांना दर्यापूर निवारा केंद्रावर योगशास्त्राचे धडे

        आपत्तीच्या काळात आरोग्य व मन:स्वास्थ्य निरामय राहण्यासाठी दर्यापूर येथील निवारा केंद्रांत सहभागींना योगशास्त्राचे धडे देण्यात येत आहेत.

          प्रवासी नागरिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी सुसज्ज निवारा केंद्रे उभारण्याबाबत निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार संचारबंदीच्या काळात दर्यापूर तालुक्यातून आपल्या गावी जाऊ न शकलेल्या प्रवासी नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था नगरपरिषदेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृहात करण्यात आली आहे.  स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे. या काळात प्रवासी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती दक्षता पाळण्‌यात येत आहे. आरोग्याबरोबरच मन:स्वास्थ्यही चांगले राहावे, यासाठी आता योगाचे धडेही देण्यात येत आहेत. योग प्रशिक्षक मंगला लाजूरकर यांनी या सर्व प्रवासी नागरिकांना योग प्रशिक्षण दिले. सामाजिक कर्तव्य म्हणून आपण दररोज योग प्रशिक्षण देणार आहोत. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारणार नाही, असे श्रीमती लाजूरकर म्हणाल्या. त्याचबरोबर, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्‌यासाठी अंतर राखणे, स्वच्छता आदी उपाययोजनांबाबत माहितीही यावेळी देण्यात आली.

        वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली मंडळी सध्या निवारा केंद्रात आहे. या सर्वांचा परस्पर परिचयही यावेळी करून देण्यात आला. येथे विरंगुळ्यासाठी संगीत, टीव्ही आदींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार योगेश देशमुख, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्याकडून वेळोवेळी निवारा केंद्रावरील सुविधांबाबत पाठपुरावा होत आहे.  जिल्हा नगरविकास प्रशासन अधिकारी श्रीमती अश्विनी वाघमळे व प्रशासकीय अधिकारी सागर ठाकरे व अमित वानखडे यांचेही उपक्रमाला मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती