विविध उद्योग- व्यवसायासाठी परवानगी प्रक्रिया सुरू



अमरावती, दि. 19 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. तथापि, अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विविध भागांतून विविध विषयांकरिता परवानगी देण्यासाठी प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातही परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजनेत कक्ष स्थापन  करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पाणी पुरवठा व इतर विभागांची बांधकामे यासाठी अमरावती शहराच्या क्षेत्रात परवानगी देण्यासाठी महापालिका आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच, महापालिका क्षेत्र वगळून इतर ठिकाणी परवानगी देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
महापालिकेच्या क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू व वाहतुकीसाठी लागणारे यंत्र, मोटरपंप, अवजड यंत्र, पाणीपुरवठा करणारे पंप, यंत्र व बॅटरी यांची दुकाने व दुरुस्तीची दुकाने सुरु करण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रात  पालिका आयुक्त यांना, तर महापालिका वगळता इतर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
 राज्य शासनाच्या 17 एप्रिलच्या अधिसूचनेत नमूद आवश्यक सेवांबाबतची सर्व दुकाने व आस्थापना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात पालिका आयुक्त व इतर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यात नमूद फरसाण, कन्फेशनरी इत्यादी सेवांबाबत महापालिकेच्या क्षेत्रात महापालिका आयुक्त व इतर क्षेत्रात संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिकारी परवानगी देतील.
 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यक कामे आणि पांदणरस्ते यांचे परवानगी प्रक्रिया संबंधित कार्यक्षेत्रातील उपविभागीय अधिका-यांच्या अखत्यारीत पूर्ण केली जाईल. एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांना एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिका-यांकडून, तर एमआयडीसी क्षेत्राबाहेरील उद्योगांना जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्याकडून परवानगी देण्यात येईल.
 कृषी वैद्यकीय आदी अत्यावश्यक सेवांबाबत मालवाहतुकीची परवानगी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात येईल. जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्याचे अधिकार पोलीस विभागाकडे देण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत कार्यक्षेत्रावर कार्यरत मजूरांमार्फतच कामे करण्यात यावीत. बाहेरून कोणतेही मजूर आणण्यास तसेच मजुरांना अथवा कुटुंबियांना कार्यक्षेत्र सोडून जाण्यास प्रतिबंध करावा, मजुरांना क्षेत्रीय बांधकामाच्या ठिकाणी दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री किराणामाल, अन्नधान्य, भाजीपाला आदी बाबी उपलब्ध करण्याची व्यवस्था कंत्राटदाराने करावी. सामाजिक अंतर ठेवून प्रत्यक्ष कामे होत असल्याची खातरजमा करून कंत्राटदार व कंत्राटदाराच्या पर्यवेक्षक अभियंत्यांनी आवश्यक कार्यपद्धती अवलंबावी. कार्य क्षेत्रावरील मजूर, कुटुंबीय कर्मचारी, अभियंते यांच्यापैकी कुणालाही कोरोनासदृश लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत तातडीने महसूल व आरोग्य विभागाला कळवावे. कंत्राटदाराने त्यांची काळजी घेऊन त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी न्यावे.  या आदेशाचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री संबंधित विभाग प्रमुख यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 काम करणारे सर्व कर्मचारी, कामगार, अधिकारी, अभियंते यांनी काम करताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज आदी साहित्य संबंधित उद्योग, व्यावसायिकाने उपलब्ध करून देण्यात यावे. संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व सूचना, माहिती सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी. कामाची सुरुवात करताना संबंधित पोलीस ठाण्याला सूचित करावे. दुकाने, आस्थापना यांना सकाळी आठ ते दोन या कालावधीत आवश्यकतेनुसार ठेवण्यास परवानगी देण्यात यावी. दक्षतेचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये दूरध्वनी क्रमांक (0721) 2662025 व ई-मेल rdc.amravati@gmail.com उपलब्ध करून देण्यात आला आहे

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती