जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना खबरदारी घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 बाहेरून येताना आपण कोरोना सोबत तर आणत नाही ना?

अमरावती, दि. 27 : जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. मास्क लावूनच घराबाहेर पडा आणि सोशल डिस्टन्स राखा. वस्तू घेऊन जाताना आपण कोरोना सोबत तर नेत नाही ना, हे लक्षात ठेवले पाहिजे. सजग राहून व नियम पाळलेच पाहिजेत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने या अनुषंगाने जनजागृती मोहिम हाती घेतली असून, क्लस्टर कंटेनमेंट झोनसह विविध ठिकाणी उद्घोषणा, फलक, सोशल मीडिया आदी विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 अशी वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. मात्र, या काळात नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्क लावूनच घराबाहेर पडावे. दुकानात सोशल डिस्टन्स राखले जाईल याची दक्षता घ्यावी. अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
दरम्यान, जिल्हाधिका-यांनी आज कंटेनमेंट झोनची पाहणी केली व या परिसरात जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी परिसरातील 6 रेशन दुकाने उघडण्याबाबत निर्देश दिले. मात्र, या दुकानदारांनी ग्राहकांत सोशल डिस्टन्स राखणे, सॅनिटायझर व मास्कची उपलब्धता आदी काळजी घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. परिसरातील काही नागरिक पॉझिटिव्ह आढळून आल्याने या परिसरातील लक्षणे असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी 1 वाहनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अनेक ठिकाणी छोटी घरे असल्याने होम क्वारंटाईन काळात सोशल डिस्टन्स पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे  महापालिकेच्या शाळांतून निवारा केंद्रे उघडण्यात आली असून, तिथे या नागरिकांना राहण्याची सुविधा करण्यात येत आहे.  त्यामुळे घरात सोशल डिस्टन्स न पाळू शकणा-या नागरिकांनी निवारा केंद्रात राहावे. तिथे उत्तम सुविधा देण्यात येत आहेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण परिसरातही बाहेरून येणारा नागरिक आढळल्यास त्याला लगेच तपासणी व क्वारंटाईन करण्यात यावे. तपासणी मोहिम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी तालुकास्तरीय अधिका-यांना दिले आहेत. 
                                    000     

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती