Friday, April 10, 2020

केशरी शिधापत्रिधारकांना मे-जून महिन्याचे अन्नधान्य सवलतीच्या दरात


नागरिकांनी सोशल डिस्टन्सींग पाळून धान्याची उचल करावी
अमरावती, दि. 10 : नोव्हेल कोराना विषाणूच्या प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट होऊ न शकलेल्या ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, अशा एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्याचे दि. 9 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गहू 8 रुपये प्रतीकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतीकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे.
ज्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झालेल्या नसतील किंवा ज्यांच्या शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झालेले नसतील, अशा एपीएल शिधापत्रिकाधारकांना देखील गहू 8 रुपये प्रतिकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे.
 उपरोक्तप्रमाणे अन्नधान्य वाटप करताना रास्तभाव दुकानदारांनी त्या शिधापत्रिकेचा क्रमांक, त्यावरील पात्र सदस्यांची संख्या तसेच शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील आदीच्या नोंदी दुकानदाराने स्वतंत्र नोंदवही मध्ये नोंदवायच्या आहे. रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांना वितरीत होत असल्याची खातरजमा करून नोंदवहीमध्ये अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्यांची स्वाक्षरी अथवा डाव्या अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ग्राहकास रितसर पावती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 सर्व एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणारे धान्य दुकानात प्राप्त झाल्यानंतर माहे मे व जूनमध्ये त्या त्या महिन्याच्या धान्याची उचल करावी. धान्य उचल करतांनादेखील दुकानाच्या ठिकाणी गर्दी न करता नियोजनबद्धरित्या, शिस्त व शांतता राखून धान्याची उचल करावी, असे आवाहन पुरवठा विभागाव्दारे करण्यात आले आहे. तसेच माहे एप्रिल महिन्यात  उपरोक्त योजनेचा लाभ देण्याचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे रास्तभाव दुकानावर गर्दी करू नये. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रास्त भाव दुकानदार व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...