Thursday, April 23, 2020

पालकमंत्र्यांचा मेळघाट दौरा ;चिखलदरा व धारणी येथे सुविधांची पाहणी









नागरिकांच्या अडचणींचे वेळीच निराकरण करा
               आदिवासी बांधवांच्या सेवा-सुविधांत हयगय आढळली तर कठोर कारवाई करू
-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

·         टेक होम रेशनची काटेकोर अंमलबजावणी करा

अमरावती, दि. 23 : मेळघाटात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासह पाणीपुरवठा, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवावा. प्रशासनाने प्रत्येक गावाचा सातत्याने आढावा घेऊन अडचणींचे निराकरण करावे.  या काळात काही अधिकारी, कर्मचारी गैरहजर असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. गैरहजर राहून आदिवासी बांधवांना त्यांच्या सेवा- सुविधांपासून वंचित ठेवल्याचा प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज धारणी येथे दिला.
            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून प्रत्येक तालुक्यात भेट देऊन तेथील यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे. त्याअंतर्गत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज धारणी व चिखलदरा येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.  त्यांनी धारणी येथे आयोजित बैठकीद्वारे पाणीटंचाई, अन्नधान्य वितरण व्यवस्था, आरोग्य, बांधकाम, मनरेगा कामे, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आदी विविध बाबींचा आढावा घेतला. आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंत वानखडे, जि. प. सदस्य महेंद्र गैलवार, दयाराम काळे, नगरसेविका रेखा पटेल, संजय लायदे, राहूल येवले,  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, वनाधिकारी प्रशांत भुजाडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कुठेही अडथळा येता कामा नये. यासंबंधी यापूर्वीही वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकही तक्रार येता कामा नये. आरोग्य यंत्रणेने सजग राहून काम करावे. तपासणी मोहिम व्यापक व तीव्र करावी.  कुणीही आपले कार्यालयीन क्षेत्र सोडता कामा नये. कुठलीही हलगर्जी झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात आदिवासी बांधवांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व आरोग्य सेवा पुरविणे हे प्राधान्याने करण्याची यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे ही कामे गांभीर्याने व्हावीत. एकही तक्रार येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पुढे म्हणाल्या की,  जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही व्हावी. ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याबाबत कटाक्षाने लक्ष द्यावे. टेक होम रेशन व स्तनदा, गर्भवती माता यांच्यासाठी आहार योजनेतून वेळोवेळी पुरवठा होत आहे किंवा कसे, याची खातरजमा स्वत: अधिका-यांनी करावी. मनरेगाअंतर्गत स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा. कृषी विभागाने शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन तत्काळ निराकरण करावे. शेतमाल खरेदीसाठी नाफेड योजनेला गती द्यावी.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे निवारण व रेशन पुरवठा याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम अधिक भरीवपणे राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी आहार पुरवठ्याची कामे वेळेत व्हावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सेवा-सुविधांचा आढावा घेतला, तसेच रंगभवन येथे निवारा कक्षाला भेट देऊन पाहणी केली. तिथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अडचणींचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.

चिखलदरा येथे भेट व पाहणी

त्यानंतर पालकमंत्र्यांनी चिखलदरा येथे भेट देऊन तेथील रूग्णालय व इतर सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. मेळघाटात कुठेही पाणीटंचाई उद्भवता कामा नये.  त्यामुळे त्यासाठी प्राधान्याने कार्यवाही व्हावी. प्रत्येक गावाची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे. ग्रामीण पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. जीवनावश्यक वस्तू पुरवठ्याबाबत सुरळीतता ठेवावी. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी विशेष लक्ष देऊन करावी व जनजागृतीत सातत्य ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...