सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई

कोरोना विषाणूचा (कोव्हिडं-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आदेश जारी

        अमरावती, दि. १२: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तसेच राज्यांमध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने  जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे.

         अमरावती जिल्ह्यात संपूर्ण क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी, चेहऱ्यावर मास्क कायम वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बाबींचे पालन न करणाऱ्या, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर संबंधित शासकीय यंत्रणेनी दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.
           रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास प्रथमवेळी आढळल्यास पाचशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तोंडाला मास्क न लावल्याचे आढळून आल्यास प्रथमतः दोनशे रुपये दंड तर दुसऱ्यांदा आढळून आल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
       
         दुकानदार, फळभाजीपाला विक्रेते तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास (दोन ग्राहकांमध्ये तीन फूटचे अंतर न राखणे व विक्रेत्यांनी मार्किंग न करणे) , ग्राहकाला दोनशे रुपये तर संबंधित दुकानदार, विक्रेताला दोन हजार रुपये दंड प्रथम वेळेस तर दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
          
        महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्या क्षेत्रात तसेच कार्यालयाच्या क्षेत्रात संबंधित शासकीय विभागाने कार्यवाही करावी. उपरोक्त आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अनुसार शिक्षा पात्र गुन्हा केल्याचे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व  महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत संबंधितावर कारवाई करण्यात येईल.

         या आदेशाच्या अनुषंगाने कार्यवाही करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी उपरोक्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी मोबाईल इत्यादीद्वारे करावी व त्यानंतर कारवाई करावी. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानी पोलिस विभागाची मदत घ्यावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती