आवश्यक तिथे पुन:तपासणी; सुरक्षिततेला प्राधान्य आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर भर - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 12 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासन आता अधिक दक्षतापूर्वक पावले उचलत असून, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, टेलिमेडिसीनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य सल्ला व उपचाराची सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. तपासणीची कार्यवाही अधिक काटेकोर व व्यापक करण्यात येत असून, आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून माहिती व आढावा घेत आहेत. त्या म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाकडून आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात येत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी शासनाने करण्यात येत आहे. पॅरोमेडिकल कर्मचा-यांना वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे अद्ययावत मनुष्यबळ उपलब्ध होईल. देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. एकही संशयित सुटता कामा नये याची खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातही आवश्यक तिथे पुन:तपासणीची कार्यवाही होत आहे.
 पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, 4 हजार 446 नागरिकांची तपासणी करण्यात आली.  गेल्या काही दिवसांत चाचणी वाढविण्यात आल्या आहेत.  थ्रोट स्वॅब तपासणीसाठी 388 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 264 नमुने निगेटिव्ह आहेत. 99 अहवाल प्रलंबित आहेत. 20 अहवाल रिजेक्टेड असले तरी त्यातील 13 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. प्राप्त अहवालानुसार अद्यापपर्यंत एक मयत व त्यांच्या संपर्कातील इतर चार अशा पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व तपासण्या काटेकोर व्हाव्यात. कुठेही शंकेला वाव राहता कामा नये व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे व आवश्यक तिथे पुन:तपासणी करण्यात येत आहे. बाधित क्षेत्रासाठी तत्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरणाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
 पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने अन्नधान्य वितरणासाठी नियोजनपूर्वक व प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश दिले आहेत. या काळात कुणीही अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट होऊ न शकलेल्या ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, अशा एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्याच्या कालावधीकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना गहू 8 रुपये प्रतीकिलो व तांदूळ 12 रुपये प्रतीकिलो या दराने प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पुरवठा यंत्रणेला दिले आहेत. धान्यवाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक सूचना व आवाहन वेळोवेळी केले जात आहे. त्याचे गांभीर्यपूर्वक पालन सर्वांनी करावे. या काळात ज्येष्ठ नागरिकांना जपणे खूप गरजेचे आहे. आपल्याला आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना विषाणुचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी आपण सुरक्षित राहणे, गर्दीत,घराबाहेर न जाणे, संपर्क टाळणे व सर्दी, ताप, खोकला आदी लक्षण आढळल्यास तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ही काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती