Thursday, April 9, 2020

ग्रामपातळीवर कार्यरत सेवकांना विमा कवच


 जीवाची जोखीम पत्करुन काम करणा-यांना संरक्षण                                                    
   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 9 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील बाजारपेठेच्या विकेंद्रीकरणासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात येत आहेत. गर्दी टाळणे व सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. या लढाईत जीवाची जोखीम पत्करून कार्यरत कर्मचा-यांचीही काळजी शासनाकडून घेण्यात येत  असून, गावात काम करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व आपले सेवा केंद्रांतर्गत काम करणा-या केंद्रचालकांना 25 लाख रूपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी सद्य:स्थिती व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर या जिल्हा प्रशासनाकडून रोज आढावा घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या की, शहरासह ग्रामीण भागातही फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात येत आहेत. कुणाही नागरिकाना ताप, सर्दी, खोकला असे कुठलेही लक्षण आढळल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. गावपातळीवर यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामसेवक, आपले सेवा केंद्रचालक यांनाही विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येथे कार्यरत असलेल्या जीवाची जोखीम पत्करून काम करणा-यांना आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. ताप तपासणी केंद्रांवर सुरक्षितता राखण्यासाठी काच बसवलेले बुथ व इतर आवश्यक साधने पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर तसेच ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी यांनीही स्वत:ची व इतरांची काळजी घेऊन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. 
त्या पुढे म्हणाल्या की, आतापर्यंत जिल्ह्यात चौघाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार, 4 हजार 71 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यापैकी एका निधन झालेल्या व्यक्तीसह तिघेजण असे चार व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्थापित कोविड-19 रूग्णालयात उपचार होत असून वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट आदी सर्व अहोरात्र त्याठिकाणी सेवा देत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत स्वॅब तपासणीसाठी 269 नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यातील 200 नमुन्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 31 रिजेक्टेड आहेत. 34 अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, वैद्यकीय पथकांकडून सर्वदूर तपासण्या होत असून, आवश्यक तिथे थ्रोट स्वॅबही घेण्यात येत आहेत. अमरावतीकर, मात करूया कोरोनावर या जिल्हाव्यापी मोहिमेत सुमारे 24 लाख नागरिकांशी संपर्क झाला. त्यात खोकला, ताप आदी लक्षणे आढळलेल्या नागरिकांशी वैद्यकीय पथकांकडून वेळोवेळी संपर्क होत आहे. आवश्यक तिथे उपचार व इतर तपासण्याही होत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, आपली लढाई अजूनही संपलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी धीर सोडू नये. खंबीर होऊन या संकटाचा सामना करावा.  या काळात शासन- प्रशासनाला सहकार्य करू इच्छिणा-यांनी पुढे आले पाहिजे.  आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.  
             शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेचे विकेंद्रीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही होत आहे. या काळात नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून गर्दी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी संयम आणि शिस्त बाळगल्यास आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू शकू, असे आवाहनही त्यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...