Monday, April 20, 2020

कोरोना चाचणी लॅब लवकरच कार्यान्वित होणार -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी यंत्रणेला सहकार्याचे आवाहन


   
अमरावती, दि. 20 :   जिल्ह्यात सर्वप्रथम पॉझिटिव्ह सापडलेल्या मृत व्यक्तींच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींचे कोरोना प्रथम चाचणी अहवाल रविवारी निगेटिव्ह आला आहे. तथापि, द्वितीय चाचणीसाठी पुन्हा स्वॅब पाठविण्यात येत आहेत. आरोग्य व विविध यंत्रणा खंबीरपणे काम करत आहेत.  या पार्श्वभूमीवर या कामाला गती मिळण्यासाठी अमरावतीतील लॅब लवकरच कार्यान्वित होईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर या प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीची रोज माहिती व आढावा घेत आहेत. त्या म्हणाल्या की, कोरोना विषाणूचा चाचणी अहवाल तत्काळ प्राप्त होण्यासाठी जिल्ह्यात विद्यापीठात तसेच पंजाबराव देशमुख रुग्णालयात नवीन कोरोना चाचणी लॅब उभारण्यात येत आहेत. सध्या विद्यापीठातील लॅबच्या विशेषज्ञांना प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. या प्रशिक्षणानंतर रुग्णांच्या थ्रोट स्वॅब चाचणीचे कामकाज सुरु होईल. यामुळे तत्काळ चाचणी अहवाल स्थानिकरित्या शहरात उपलब्ध होऊ शकेल व त्याअनुषंगाने उपचार पध्दतीला गती मिळेल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात लवकरच ही लॅब सुरू होईल. त्याचप्रमाणे, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातही लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची परवानगी आदी प्रक्रिया पूर्ण व्हावी, असा प्रयत्न आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात काल चारजणांचे कोरोना प्रथम चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून कोव्हिड-19 रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होत आहेत. यानंतर पुन्हा स्वॅब चाचणी करण्यात येईल व त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबतची कार्यवाही होईल. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार अद्यापपर्यंत 5 हजार 261 नागरिकांची तपासणी होऊन 615 नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील 450 नमुने निगेटिव्ह असून 77 नमुने प्रलंबित आहेत. 82 नमुने रिजेक्टेड आले असले तरी 57 नमुने पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. 58 नमुने आज रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. कुठेही शंकेला वाव राहू नये, काटेकोर तपासणी व्हावी व सर्वांची सुरक्षितता जपली जावी, असा त्याचा हेतू आहे.
       त्या पुढे म्हणाल्या की, या संकटकाळात डळमळीत झालेली अर्थव्यवस्था सावरण्याचे आव्हानही शासनापुढे आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासह आवश्यक सेवा सुरू राहाव्यात, कोरोनामुक्त क्षेत्रातील उद्योगधंदे सुरू व्हावेत व आवश्यक विकासकामांना गती मिळावी, यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आवश्यक कामे, पांदणरस्ते आदी कामांची परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीमधील व औद्योगिक वसाहतीबाहेरील बाहेरील उद्योगही सुरू होतील. त्यामुळे संबंधित उद्योजक, कंत्राटदार, व्यावसायिक यांनी आपले कामगार, कर्मचारी यांची सुरक्षितता राखणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी दिले.  
आस्थापनांनी कामगारांना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावयाचे सांगून दक्षता पाळावी. कामगारांना तोंडाला नेहमी मास्क लावण्याचे सांगून निर्जुंतुकीकरणाचे महत्व पटवून द्यावे. या काळात संबंधित उद्योग व व्यवसायाने आपले अधिकारी व कर्मचारी यांची पूर्णत:  काळजी घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यासह विविध विभाग अथक परिश्रम घेऊन चांगले काम करीत आहेत. जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, नर्सेस व इतर यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांचे मनोबल खच्ची होईल, अशी वक्तव्य, कृती कुणीही करू नये. हा काळ सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे या काळात सर्वांनीच संयम राखणे गरजेचे आहे. नागरिकांनीही संचार बंदीच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करुन यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...