Sunday, April 12, 2020

चुरणी परिसरात जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रशासनाकडून मालवाहतूक


चिखलदरा प्रशासनाचा उपक्रम

चिखलदरा तालुक्याच्या सीमेलगतचा भैसदेही हा मध्यप्रदेशातील तालुका कोरोना संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पूर्णत: सील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या मेळघाटातील चुरणी परिसरातील गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असाव्यात, यासाठी परिसरातील घाऊक व्यापा-यांना आवश्यक माल पोहोचविण्याची जबाबदारी  प्रशासनाने घेतली असून, त्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे वाहनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
          चिखलदरा तालुक्यातील जवळजवळ एक तृतीयांश भाग हा चुरणी, काटकुंभ, हतरू अशा दुर्गम परिसरातील आहे. या भागालगत मध्यप्रदेशातील भैसदेही येथे कोरोना रूग्ण आढळून आल्याने लगतच्या चिखलदरा तालुक्यातील सीमावर्ती गावांतील नागरिकांत चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे चिखलदरा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी या परिसरातील गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोधैर्य वाढविले व त्यांना आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली._
      येथील व्यापारी अनेकदा भैसदेही येथून माल आणतात. मात्र, भैसदेही  तालुका पूर्णत: सील करण्यात आल्याने गावांमधील दुकानांमध्ये आवश्यक किराणा माल व वस्तूंचा तुटवडा होऊ नये, यासाठी काटकुंभ, हतरू, चुरणी परिसरातील व्यापा-यांची बैठक घेण्यात आली. परिसरात सुमारे १५ घाऊक व्यापारी आहेत. भैसदेहीऐवजी परतवाड्याहून माल उचलल्यास वाहतुकीचे अंतर वाढते. त्यामुळे परिसरातील ठोक व्यापा-यांना माल पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. माल वाहतुकीसाठी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्या निर्देशान्वये आदिवासी विकास महामंडळाकडील वाहनही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
            त्यासाठी ठोक व्यापा-यांना आवश्यक मालाच्या याद्या मिळविण्यात येतील. वॉलमार्टने या याद्यांनुसार माल पुरविण्याची तयारी दर्शवली असून, व्यापा-यांकडून त्याचे ऑनलाईन पेमेंट केले जाईल. घाऊक व्यापा-यांना आवश्यक माल प्राप्त झाल्यावर तो छोट्या दुकानांत वितरीत केला जाईल. या काळात कुणीही चढ्या भावाने विक्री किंवा साठेबाजी करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.  तलाठी, ग्रामसेवक यांनी या कामाचे संनियंत्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.    
            या सुविधेमुळे दुर्गम परिसरातही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही व साठेबाजी, चढ्या भावाने विक्री यांनाही आळा बसेल. परिसरातील व्यापारी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

              चुरणी येथे शिवभोजन केंद्र

            चुरणी येथे बँक, दवाखाना असल्याने परिसरातील गावांतील नागरिक कामानिमित्त येत असतात. संचारबंदीच्या काळात उपाहारगृहे बंद असल्याने येथे  शिवभोजन केंद्र सुरु करण्यात  आले आहे. तिथे ४० थाळ्यांची  उपलब्धता आहे. परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.

                                                            ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...