पालकमंत्र्यांकडून धामणगाव, चांदूर, नांदगाव खंडेश्वर आढावा व पाहणी


सुविधांपासून कुणीही वंचित राहू नये

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

·        अधिकारी- कर्मचा-यांनी मुख्यालयी राहूनच काम करण्याचे निर्देश

अमरावती, दि. 3 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा नियमित व्हावा. एकही व्यक्ती सुविधेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर येथील आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, निवारा केंद्रे यांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. निवारा केंद्रांतील नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आरोग्य, महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या अधिका-यांची बैठक घेऊन आढावाही त्यांनी घेतला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासन विविध पावले उचलत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात दक्षतेचे पालन झालेच पाहिजे कारण ही निकराची वेळ आहे. या वेळेचे गांभीर्य राखून प्रशासनाने काम करावे व इतरांचेही सहकार्य मिळवावे.  आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. या काळात ते अविश्रांतपणे सेवा बजावत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामीण यंत्रणेतील आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे कर्मचा-यांनीही मुख्यालय सोडू नये. अमरावतीकर, मात करूया कोरोनावर हे अभियान प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार घरोघर संपर्क करावा. जनजागृती करावी. परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा. आपण सर्वांनी मिळून ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून काम करावे.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वांना वेळेत व्हावा, यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. केवळ जिल्ह्यातील स्थानिक नागरिकच नव्हे, तर या काळात जिल्ह्याबाहेरून आलेले पण संचारबंदीमुळे अडकलेले अनेक नागरिक आहेत. त्यांच्यासाठी निवारा केंद्रे सुरु केली आहेत. त्यांची गैरसोय होता कामा नये. एकही व्यक्ती जीवनावश्यक वस्तू व सेवा मिळण्यापासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

स्वयंसेवी संस्थांचे मोठे सहकार्य मिळत आहे. त्यांच्यासह विविध क्षेत्रातील संस्थांनाही आवाहन करावे. त्यांचे सहकार्य मिळवावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी तालुक्यातील क्वारंटाईन व्यक्ती, तपासणी स्थिती, रूग्णालय व आरोग्य सुविधा, निवारा केंद्रे आदी बाबींचा आढावा घेतला.  डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचा-यांशी चर्चाही त्यांनी केली व त्यांचे मनोबल वाढविले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती