‘सुपरस्पेशालिटी’त स्वतंत्र कोविड रुग्णालय




विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांचा आरोग्य अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद
अमरावती, दि. 2 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी येथील विभागीय संदर्भ रूग्णालयात स्वतंत्र कोविड रुग्णालय स्थापण्यात येत असून, त्यासाठी सुमारे 100 आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पीयुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या स्टाफशी संवाद साधून त्यांना विविध सूचना दिल्या. 
अमरावतीत अद्यापि एकही रूग्ण आढळून आला नाही. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ रूग्णालयात हे रूग्णालय स्थापित होत आहे.त्यासाठी 100 डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षारक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व स्टाफचा रूग्णालयाच्या परिसरातील वसतिगृहातच निवास असेल. दहा दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल. त्यानंतर या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास नवा स्टाफ नियुक्त होईल. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
या रूग्णालयात नियुक्त आरोग्याधिकारी व कर्मचारी हे शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत. रूग्णालयाच्या तळमजल्यावर नोंदणी विभाग तयार करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यावर कोविड 19- संशयित तपासणी व विलगीकरण कक्ष 1 व 2, तसेच दुस-या मजल्यावर रूग्णकक्ष असेल. चौथ्या मजल्यावर आयसीयु कक्ष 1 व 2 निर्माण करण्यात आला आहे. हे रूग्णालय 100 खाटांचे आहे. त्यातील 60 खाटा पॉझिटिव्ह रूग्णांसाठी,  40 खाटा संशयित रूग्णांसाठी असतील.
डॉक्टर, पारिचारिका, इतर कर्मचारी वर्ग निष्ठापूर्वक सेवा बजावत आहेत. या काळात जागरूक राहून स्वत:चीही काळजी घ्यावी. कुठलीही अडचण आल्यास तत्काळ कळवावे. साधनसामग्री, औषधसाठा सुसज्ज ठेवावा. शिफ्टवाईज अधिकारी- कर्मचा-यांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी, आदी निर्देश यावेळी देण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. श्रीकांत महल्ले, डॉ. तुळशीदास भिलावेकर, डॉ. प्रशांत घोडाम यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, पारिचारिका, सुरक्षारक्षक आदी यावेळी उपस्थित होते.
                                                000

   

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती