Thursday, April 9, 2020

जिल्ह्यात 118 फीव्हर क्लिनिक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजना

अमरावती, दि. 9 : कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी ताप दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. कुणाही नागरिकाला ताप, खोकला आदी लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने या क्लिनीकमध्ये जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर ही मोहिम राबविण्यात आली असून, त्याअंतर्गत 24 लाख नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. ताप, सर्दी, खोकला, श्वसनक्रियेत अडथळा आदी लक्षणे कुठल्याही नागरिकात आहेत किंवा कसे, याची माहिती मिळवणे व आवश्यक ते उपचार व इतर कार्यवाही करणे हा मोहिमेचा उद्देश होता. मोहिमेत आतापर्यंत सर्दी, ताप, खोकला आदी यापैकी एखादे किंवा अधिक लक्षण आढळलेले सुमारे 21 हजार नागरिक आढळून आले. प्रत्येक सर्दी, ताप, खोकला हा काही कोरोना नसतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. मात्र, दक्षता घेणे ही आपली जबाबदारी आहे.  या नागरिकांची आवश्यक तपासणी, त्यांच्याशी नियमित संपर्क, मार्गदर्शन, उपचार आदी प्रक्रिया वैद्यकीय पथकांकडून होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, संसर्ग प्रतिबंधासाठीचे उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी आता जिल्ह्यात 118 क्लिनीक महापालिका व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहेत. ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास नागरिकांनी स्वत:हून जाऊन या क्लिनीकमध्ये तपासणी करावी. तपासणी केंद्रात काम करणा-या कर्मचा-यांची पुरेशी काळजी घेतली जात आहे. चाचणी केंद्रावर बुथची निर्मिती करून काचही बसविण्यात येणार आहे. त्याखेरीज, विशेष पथकांकडून आवश्यक त्या ठिकाणी तपासणी होत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कुठलीही माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.
                             000

  

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...