खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांची साठवण काळजीपूर्वक करावी



अमरावती, दि. 13  :  या वर्षीच्या खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र सुमारे सव्वा तीन लाख हेक्टर असून गेल्यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पेरणी करण्यासाठी सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी घरी तयार केलेले चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणेच पेरावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सोयाबीन बियाणे संदर्भात काही महत्वाच्या तथ्यांबाबत शेतकऱ्यांना याव्दारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने व पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन, हे बियाणे म्हणुन शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. यासाठी ग्रामबिजोत्पादन पीक प्रात्यक्षिके, शेतकरी समुह इत्यादी कार्यक्रमांतर्गत उत्पादीत बियाण्यांचा वापर शक्य आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगला प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबीन बियाण्यांची बाह्यावरण कवच नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवण करण्यापूर्वी बियाणे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री किंवा सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के पर्यंत आणावे.
सोयाबीन बियाणे साठवणुक करण्यासाठी बियाण्यांची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती खडे इत्यादी काढुन ते स्वच्छ  करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या किंवा नविन पोत्यात साठवुन ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणीचे ठिकाण थंड ओलावा विरहित व हवेशीर असावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करुन नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण शक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासुन 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यासाठी पोत्याची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकचा वापर करावा तेसच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपुर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. बिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी समुह तसेच गटांमार्फत उत्पादीत होणाऱ्या बियाण्यांचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2019 मध्ये प्रमाणित सोयाबीन बियाणे पेरले होते तसेच विविध कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिक प्रात्यक्षिके आयोजित केली होती, अशा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून स्वत:साठी व इतर शेतकऱ्यांसाठी बियाणे म्हणून वापरण्यास द्यावे.
उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने नजीकच्या कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक तसेच अन्‍य कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोयाबीन बियाणे संदर्भात मार्गदर्शन घ्यावे. येत्या खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन उपलब्धतेची व्याप्ती वाढवावी व सोयाबीन बियाण्यांचा तुडवडा निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती