बाजार समितीत फळ व भाजीविक्रीसाठी स्वतंत्र दिवस

गर्दी टाळण्यासाठी शहरात होलसेल मार्केट आणि भाजी बाजाराचे विकेंद्रीकरण
     







अमरावती, दि. 9  : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीत फळ व भाजीविक्री स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज निर्गमित केला.
 शहरातील होलसेल मार्केट, धान्य बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीबाजार, फळबाजार यांचे विकेंद्रीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. त्यानुसार मुख्य बाजारपेठांतील गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज बाजार समिती व सायन्सकोर मैदानाची पाहणी व समितीच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव दहिकर, मोहम्मद आरिफ अन्सारी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
 त्यानुसार बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळे यार्डमध्ये प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी भाजीपाला बाजार सुरू राहील. तसेच मंगळवार, गुरूवार व शनिवारी फळबाजार सुरू राहील.
त्याचप्रमाणे, बाजार समितीच्या मुख्य भाजीपाला यार्डातील गर्दी कमी करून विकेंद्रीकरण करण्यासाठी सायन्सकोर मैदानाप्रमाणेच दसरा मैदान उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे, बडनेरा रस्त्यावरही किरकोळ व ठोक भाजीपाला व फळ बाजार सुरू करण्यात येणार आहे. दसरा बाजार व सायन्सकोर मैदान अधिग्रहित करून बाजार समितीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
  बाजार समितीच्या मुख्य यार्डमधील मुख्य प्रवेशद्वार हेच बाजार समितीत प्रवेश करण्याचे आवकद्वार राहील. याठिकाणी एकेरी वाहतूक लागू असेल. आत येणारी वाहतूक ही फळ बाजाराच्या दाराने बाहेर जाईल. त्यामुळे येण्या- जाण्याचा मार्ग वेगळा असेल. कोणत्याही परिस्थितीत एकाच मार्गाने ये-जा होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहे.
बाजार समितीच्या मुख्य भाजीपाला यार्डात कांदा, बटाटा, लसूण यांची आवक पहाटे चार ते सकाळी 11 वाजेदरम्यान कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
                        मास्क हवाच
मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला बाजार समितीच्या आवारात, तसेच सायन्सकोर मैदानावर, दसरा मैदानावरील फळे व भाजीबाजारात प्रेवश देण्यात येऊ नये, तसेच स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.  
                    बंदोबस्त ठेवा
            सायन्सकोर मैदान, दसरा मैदान, मुख्य भाजीपाला, फळ बाजार येथे पहाटे 5 ते दुपारी 12 या कालावधीत गर्दी नियंत्रण व यार्डसमोरील रस्त्यावरील वाहतूक नियमन करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचेही निर्देश आहेत. बाजार समितीच्या कामकाजाचे संनियंत्रण करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
                                    होलसेल मार्केटचे विकेंद्रीकरण
दरम्यान, धान्य बाजार व होलसेल मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या विक्रेत्यांनी आपल्या मालाची विक्री आपल्या  इतरत्र असलेल्या दुकानांतून करावी. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कुठलाही अडथळा येऊ नये, असेही निर्देश श्री. नवाल यांनी दिले. त्यांनी याविषयी घाऊक विक्रेत्यांशी चर्चाही केली.
                                                            00


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती