संकटकाळात यंत्रणेचे मनोबल टिकवून ठेवणे गरजेचे शासकीय यंत्रणेला सहकार्य करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर




अमरावती, दि. 19 : _कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. या काळात सर्वांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. हा संकटकाळ सर्वांचीच परीक्षा पाहणारा आहे. त्यामुळे यंत्रणेचे मनोबल टिकवून ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून, शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी होत असल्यापासून डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विविध यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टर, पारिचारिका यांची जबाबदारी या काळात सर्वात मोठी असून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते अविरतपणे कार्यरत आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाचा सामना करणे हे यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. जगभर अनेक ठिकाणी इतक्या व्यापक प्रमाणावर हे पहिल्यांदाच घडत असल्याने अनेक उपाय नव्याने करावे लागत आहेत. तुलनेत चाचणी प्रयोगशाळांची संख्या कमी आहे. त्यामुळे चाचणी अहवाल मिळण्यासही काहीसा वेळ लागत आहे. त्यासाठी नव्याने प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, त्या लवकरच कार्यान्वित करण्यात होत आहेत. सध्या इतर ठिकाणी सुरु असलेल्या प्रयोगशाळांवरील ताणही वाढला आहे. एखादा अहवाल रिजेक्ट झाला तरी त्याबाबत कुठेही शंकेला वाव राहू नये तो पुन:तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. सर्वांची सुरक्षितता जपली जावी, हा त्याचा हेतू आहे.
 या परिस्थितीत शासकीय आरोग्य यंत्रणा स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता कार्यरत आहेत. अनेक डॉक्टर, पारिचारिका यांना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागत असल्याने ते आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत. अशा काळात त्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ नये, यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याची गरज आहे. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते, समाजातील विविध मान्यवर, उद्योजक, नागरिक या सर्वांनीच शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलीस, महसूल प्रशासन, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका असे अधिकारी- कर्मचारी यांच्याकडून सर्वेक्षण, तपासणी मोहिम, माहिती संकलन, सातत्याने देखरेख, संपर्क, पाठपुरावा अशी अनेक कामे होत आहेत. अशा प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून उपाययोजना कराव्या लागतात. अनेकदा त्यात दुरुस्तीही होऊ शकते. मात्र, अनेक कामे नव्याने करावी लागत आहे. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागत आहेत. त्यामुळे या संकटकाळावर मात करण्यासाठी सर्वांनीच संयम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे. वैद्यकीय पथकांबरोबरच पोलीस यंत्रणेवरही संशयितांची हिस्टरी तपासणे, चौकशी, संचारबंदीमुळे लागू झालेल्या नियमांचे पालन होण्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखणे अशी कामे अनेक कामे करावी लागत आहेत. या काळात यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. त्यामुळे यंत्रणेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये. तेही जीवाची बाजी लढून कामे करत आहेत. त्यामुळे शासकीय प्रयत्नांना सहकार्य करावे व त्यांचे मनोबल टिकवून ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती