पालकमंत्र्यांकडून ताज व रॉयल पॅलेसला क्वारंटाईन कक्षाची पाहणी






घरोघरी तपासणीला सहकार्य करा
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन
           
अमरावती, दि. 8 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात व जिल्ह्यात घरोघर तपासणी सुरु आहे. त्यानुसार मुस्लिमबहुल वस्त्यांमधून ही तपासणी होत आहे. येथील नागरिक बांधवांनी तपासणीला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज दुपारी वलगाव मार्गावरील ताज व रॉयल पॅलेसमध्ये येथे तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. तेथील व्यवस्था व सेवा सुविधांचीही पाहणी त्यांनी केली. महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह आरोग्य अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. 
            शहरातील निधन झालेल्या व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील आणखी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या परिस्थितीत परिसरातील लक्षणे आढळणा-या नागरिकांना होम क्वारंटाईन म्हणून ठेवता येणार नाही. त्यासाठी  त्यांना ताज व रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य पथकाची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. तेथील वैद्यकीय अधिका-यांशीही पालकमंत्र्यांनी चर्चा केली.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लक्षणे आढळताच तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक असते. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे  कोणत्याच उपचाराकरिता भीती बाळगू नये. जिल्हा प्रशासन तुमच्यासोबत आहे. माहिती देण्यासाठी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 
महापालिका प्रशासनाकडून डोअर टू डोअर जाऊन सर्दी, खोकला व ताप असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. त्यांना सहकार्य करुन आपले व आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे नुकसान होण्यापासून वाचवावे. आपण सर्वांनी मिळून कोरोनाविरोधात यशस्वी लढा देऊ. आपण सहयोगानेच ही लढाई जिंकता येईल, असेही त्या म्हणाल्या.     
यावेळी हाफिज नाजिम अंसारी, हाजी मोहम्मद शकील, डा. सैयद अबरार, मुक़द्दर पठान, मेराज खान पठान, मौलाना मुश्फिक, एड. शोएब खान, हमिद शद्दा, नजीर खान, सलाउद्दीन शेख बबलू समेत यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.

                                                0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती