Friday, April 17, 2020

पत्रकार बांधवांना विमा कवच मिळावे - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पालकमंत्र्यांकडून केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
                             


अमरावती, दि. 17 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य, पोलीस विभाग, प्रशासन यांच्यासह विविध माध्यमांचे पत्रकार बांधवही अहोरात्र सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना 50 लक्ष रूपयांचे विमा कवच मिळावे, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. कोरोना संकटकाळात पत्रकारांना आर्थिक सुरक्षा विमा मिळण्याबाबत अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे शासनाला निवेदन देण्यात आले असून, त्याची तत्काळ दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सदर मागणीचा सकारात्मक विचार व्हावा, अशी विनंती केंद्रिय सूचना व प्रसारण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना केली आहे.
 आजच्या संकटकाळात आरोग्य विभाग, डॉक्टर, प्रशासन यांच्या सोबतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, पत्रकार बांधव हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून कार्य करत आहेत. या गंभीर संकटात सामाजिक दायित्व म्हणून आरोग्य विभाग, डॉक्टर, पोलीस, कर्मचारी यांना 50 लाख रूपयांचे विमा संरक्षण घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रकारची, आर्थिक सुरक्षा जीवावर उदार होऊन कार्य करणा-या विविध माध्यमांच्या संपादक, पत्रकार बांधवांनाही मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांना 50 लक्ष रूपयांचे विमा कवच मिळावे, अशी शिफारस पालकमंत्र्यांकडून करण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे, अरुण जोशी यांच्याकडून प्राप्त निवेदनाची पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत शिफारशीचे पत्र पाठविले आहे.
                             000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...