कापूस खरेदी तत्काळ सुरू व्हावी - महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महिला व बालकल्याण मंत्र्यांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार व पणन मंत्र्यांना पत्र
                        कापूस उत्पादक शेतकरी बांधवांच्या प्रश्नाकडे लक्षवेध   
             

अमरावती, दि. 17 : विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये कापूस हे खरीपातील मुख्य पीक आहे. कोरोना प्रतिबंधामुळे संचारबंदी लागू असून, कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आवश्यक दक्षता घेत कापूस खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
तसे पत्र पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
            राज्यातील कापूस उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्याशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना त्याबाबत पत्र लिहून शेतकरी बांधवांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
सन 2019-20 मध्ये खासगी बाजारपेठेमध्ये कापसाचे दर कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हमी दराने शासनाला राज्यामध्ये सीसीआयचे सबएजंट म्हणून कापूस पणन महासंघ खरेदी करत आहे. सद्य:स्थितीत कोविड-19 च्या अनुषंगाने संचारबंदी लागू असल्याने 22 मार्चपासून खरेदी बंद आहे. येणा-या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शेतक-यांना पैश्याची गरज लक्षात घेता शासनाद्वारे एफएक्यू कापूस खरेदी सुरु करावी. तसेच (नॉन एफएक्यू) हलक्या दर्जाचा कापसाच्या खरेदीकरिता खासगी खरेदी त्वरित सुरु करण्याबाबत उचित आदेश देण्यात यावे, अशी विनंती महिला व बालविकास मंत्र्यांनी केली आहे.
याबाबत कापूस पणन महासंघाच्या पदाधिका-यांशीही चर्चा केली आहे. त्यांनी नमूद केल्यानुसार, शासनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस विक्रीकरिता उत्सुक असलेल्या शेतक-यांची नोंदणी करण्याबाबत आदेश काढण्यात यावा, शासकीय खरेदीसाठी शेतक-यांनी फक्त एफएक्यू ग्रेडचा कापूस आणावयाचा असून, त्यांना वेळेबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सूचना देण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, तसेच जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या ठिकाणी कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. सर्व बाजार समित्यांना तशा सूचना पणन संचालकांकडून देण्यात याव्यात. आवश्यकतेनुसार जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून पासेसचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक आदी करतेवेळी लागणा-या मजुरांकरिता आवश्यक परवानगी जिल्हाधिका-यांच्या स्तरावरून देण्यात यावी. कापूस पणन महासंघ व सीसीआयद्वारे नॉन एफएक्यू प्रतीचा कापूस स्वीकारला जाणार नाही याबाबत दबाव निर्माण करून अनुचित प्रसंग उद्भवणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्ताची व्यवस्थाही असावी, असे पणन महासंघाच्या पदाधिका-यांनी नमूद केले आहे. हे मुद्दे कामकाजाच्या दृष्टीने योग्य असून, आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत व लवकरात लवकर कापूस खरेदी सुरू करण्यात यावी, अशी विनंती महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.
                                                000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती