नागरिकांना पालकमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन


आणखी दक्षता घेण्याची गरज
एकजुटीने दक्षतेचे पालन करूया
- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
जिल्ह्यात निधन झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, या पार्श्वभूमीवर आता अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. हा आपल्या सर्वांच्या कुटुंबाचा, राज्याचा, देशाचा प्रश्न आहे. त्यामुळे एकजुटीने दक्षतेचे पालन केल्याशिवाय आपण या संकटावर मात करू शकणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू, माता, भगिनी, समस्त नागरिकांनी गर्दी टाळावी. घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्‌याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यात निधन झालेल्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानुसार यंत्रणेने अधिक सजगपणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. त्या म्हणाल्या, निधन झालेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी, संबंधित परिसरात राबवावयाची कार्यवाही प्रशासनाने काटेकोरपणे करावी. आरोग्य यंत्रणा, महापालिका व जिल्हा परिषद या यंत्रणांनी आपल्या वैद्यकीय पथकांना अधिक सजग करावे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अनियमितता येणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी. विविध यंत्रणा चांगले काम करत आहेत. मात्र, आता अतिदक्षतेची वेळ आहे. या काळात सजग राहून कामे करावीत व स्वत:चीही काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
नागरिकांना आवाहन करताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, आपल्या सहकार्याशिवाय कोरोनाविरूद्धची लढाई जिंकता येणार नाही. हा विषाणू कोणताही जातधर्म पहात नाही. अतिप्रगत देशातही या संकटाने भीषण रूप धारण केले आहे. त्याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे जातपात, धर्म, सारे विसरून या संकटाचा एकजुटीने सामना करूया. प्रशासन त्याची जबाबदारी पार पाडत आहे. आपणही आपली जबाबदारी ओळखून दक्षता घेऊया व आपल्या कुटुंबाचे, राज्याचे, देशाचे रक्षण करूया. स्वच्छतेचे पालन, गर्दी टाळणे व घराबाहेर न पडणे ही दक्षता प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने दक्षतेचे पालन केल्यास आपण हे युद्ध नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती