महिला व बालविकास मंत्र्यांकडून विभागाचा आढावा महिलागृहे व बालगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन अडचणी सोडवा- महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर



*अंगणवाड्यातील बालकांना घरपोच शिधा

* १५ दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण मंत्री यांचे उद्दिष्ट

अमरावती, दि. 17 :  कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू आहे. या काळात अधिका-यांनी राज्यातील महिलागृहे, बालगृहे यांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अडचणी सोडवा. घरपोच पोषण आहार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करा. एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
                       महिला व बालकल्याण मंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकारी यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद,  एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो यांच्यासह विविध जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.
            अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यात १०० टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधावाटपाचे उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आखले आहे. त्यानुषंगाने यावेळी प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
त्या म्हणाल्या की, शिधावाटप विहित मुदतीत पूर्ण झाले पाहिजे.  एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये.
अमृत आहार योजनेंतर्गत दिल्या जाणा-या चौरस आहार, अंगणवाडी सेविकांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करणे, नागरी भागात काम करणा-या अंगणवाडी सेविका-मदतनीसांनी प्रोत्साहनपर भत्ता विमा, तसेच आरोग्य कर्मचा-यांसाठी लागू करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्कीम अंगणवाडी सेविका-मदतनीसांनाही लागू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
राज्यातील एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन काटेकोर नियोजन करुन सर्वांना आहार पुरविण्यात यावा, असे निर्देशही श्रीमती ठाकूर यांनी दिले.

           श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे सुरुवातीच्या काळात पुरवठ्यात निश्चित काही अडचणी आल्या. मात्र, सर्वांच्या प्रयत्नाने त्यावर मात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अद्यापही अडचणी दिसून येत आहेत, तिथे किंवा ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, त्याठिकाणी अस्तित्वात असलेल्या महिला व बाल गृह, बेघरगृह येथे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत उपाययोजनेसाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालगृहांना, महिला गृहांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. संचारबंदीच्या काळात सुरळीत वस्तू पोहोचतील यासाठी काटेकोर नियोजन करावे. त्याठिकाणी निर्जंतुकीकरणासह मॉस्क व सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे.

 पुणे नागरी प्रकल्पाचा आढावा घेताना तेथील काही अंगणवाडी सेविकांना घरगुती हिंसाचाराचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले. यात अधिका-यांनी लक्ष घालून अशा घटनांना वेळीच प्रतिबंध घालावा. बीड जिल्ह्यात स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी मोठ्या संख्येने नागरिक मूळ गावी परत आले. अशा स्थलांतरितांच्या सुविधेसाठी घरोघर सर्वेक्षण करण्यात आले व एक ॲप विकसित करून मास्टरलिस्ट तयार करण्यात आली. त्याआधारे बालके, गरोदर माता यांना शोधून प्राधान्याने नोंद घेऊन अंगणवाडी सेवांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्र्यांनी दिले.
   


0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती